मुंबई : राज्यात आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहे. राज्यात नवीन समीकरण घडून येत कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना पक्ष मिळून सरकार स्थापन करत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अजित पवार याना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी आघाडी सरकारसंदर्भात ट्विट करत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी आजचा सूर्योदय एका नवा इतिहास रचतोय. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्यात येत आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. देशात महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतिपथावर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण काम करू.
उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून, या ऐतिहासिक सोहळ्यासाठी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व एच. डी. देवेगौडा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, पंजाबचे कॅप्टन अमरेंद्र सिंग, भूपेश बघेल (छत्तीसगड), व्ही. नारायणस्वामी (पुड्डूचेरी), ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल) तसेच चंद्राबाबू नायडू, मुलायमसिंग यादव, अखिलेश यादव आदी नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
या शपथविधी सोहळ्यासाठी राज्यातील ४०० शेतकऱ्यांना विशेष निमंत्रित केले आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनाही आमंत्रित करण्यात आल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना एका शेतकऱ्याने मला तुमच्या शपथविधीला बोलवा, अशी विनंती केली होती. त्या शेतक-यास आवर्जून निमंत्रण पाठवले आहे. त्यामुळे हा शपथविधी सोहळा ऐतिहासिक बनण्याची शक्यता आहे.