भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो.जगाच्या पाठीवर क्वचितच एवढ्या तरुणांची संख्या इतर देशात असावी! पण तरीही इतर विकसित राष्ट्रांच्या तुलनेत आपण मागेच! भारतीय संस्कृती थोर असून, याच पावन भूमीत अनेक शूर लढवय्ये, महान संत-पंत व आपल्याला आदर्श ठरावे असे अनेक महात्मा होऊन गेलेत. ज्या भारत देशात साधी टाचणी निर्माण करण्याची क्षमता नव्हती, तिथे आज प्रचंड पोलादी यंत्रे, अंतराळ्यान तयार होत आहे. हे निश्चितच भूषणार्ह होय! पण तरीही युरोपीयन देशा बरोबरीने यायला आपल्याला कित्येक दशके लागतील हे निश्चितपणे सांगता येणार नाही.देशात तरूणाईची संख्या इतकी प्रबळ असूनही आपली अवस्था अशी का व्हावी? याला जवाबदार कोण? ज्या देशात तरुणांची संख्या जास्त आहे. तो देश जगातील राष्ट्राच्या घोडदौडीत प्रत्येकच क्षेत्रात समोर असायला हवा, पण आपण मागेच ..! हे आपल दुर्दैवच म्हणावं लागेल.
नवंवर्षाला आता काहीच क्षण बाकी असून आपण जाणार्या आणि येणार्या दोन्ही वर्षाच्या स्वागतासाठी आतुरलेलो आहोत. तरूणाईच्या या देशात नवंवर्षाचे क्षण मोठ्या उत्साहाने, आवेशाने साजरे केले जातात, हे सांगण्याची नवलाई नको! नववर्षाच स्वागत करण्यास आपल्या देशातील मदिरालये, विदेशी मादक बार, पब, कॅफे, हॉटेल्सही सुसज्ज झाले असावेत. आजची मदमस्त तरूणाई इथे जावून थीरकेल, नाचेल गाण्याची रंगत व डीजेची संगत यातच तो नववर्षाच स्वागत मोठ्या जल्लोषात पार पाडेल. डिजिटल देशातील तरूणाई कुठे तरी चूकतेय असं, मी मुळीच म्हणणार नाही! कारण तरूणाईच्या उंबरठयावर असलेल्या तरुणांच मन जरी अस्थिर, चांचल्य, अविवेकानी भरलेल असंल तरीही आयुष्यातील हीच ऊन्मादक अवस्था त्याला आपल्या स्वप्नांच्या व ध्येयाच्या परमोच्च पदावर पोहचू शकते, यात शंका नाही ! कारण याच तरूण वयात अशक्याचे शक्य करण्याची धमक तो ठेवू शकतो, याच वयात ध्येयाच क्षितीज तो गाठू शकतो, याच वयात विविध कल्पनांना व काव्य रचनांना तो आकार देऊ शकतो, याच वयात सुंदर शिल्प व चित्रं तो साकारु शकतो, याच वयात पूर, भूकंप अश्या कित्येक नैसर्गिक आपत्तीतून लोकांना वाचवू शकतो व याच तरूणाईत ज्ञानाच्या खानीतून विविध नवरत्ने तो शोधू शकतो. आशेने, धैर्याने स्पुर्तीने झपाटलेल्या या तरूणाईला वयातील कुठलीही अवस्था सर करू शकत नाही, असंच मी म्हणेल! पण ज्या तरूणाईला आत्मसंयम, आत्मजाणीव व आत्मसुधारनेची खरी गरज असते. त्याच गुणांकडे तो आज दुर्लक्ष करीत आहे. ज्या तरूण वयात शिवाजी महाराज मूठभर माळव्यांना घेवुन मुगलांचा विध्वंस करू शकतो, ज्या तरूण वयात आझाद हिंद सेनेची स्थापना करून सुभाषचंद्र बोस सारखे तरूण नेतृत्व स्वातंत्र्याच्या अभेद्य गर्जना करू शकते.
ज्या तरूण वयात स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करून आपले तेजस्वी विचार या समाजात रुजवू शकते त्या प्रगल्भ आत्मविश्वासाची देशाच्या तरूणाईला गरज आहे. देशाप्रेमासाठी आपले प्राण समर्पित करणार्या त्या क्रांतिकारक तरूण बंधूंची गरज आहे तर द्रोणाचार्य सारख्या गुरूंची व अर्जुनासारख्या शिष्यांची आज देशाला गरज आहे. ज्या देशात अश्या तरुणांच्या इतिहासाची प्रांजळ जोत तेवत आहे, त्या देशातील तरूण मागे का असावा? तांत्रिकप्रगतीमुळे शेकडो मीलाच अंतर मानवाला जवळ करता आलं, पण मानव यातच तो स्वत:ची गती आणि नितीही विसरून बसलाय! त्यामूळे वरदान रूपी हे तांत्रिक सुदर्शनचक्र आजच्या तरूणाईला कितपत फायदेशीर की धोकादायक ठरणार हा येणारा काळच ठरवू शकतो. शास्त्र, कला, साहित्य, समाजरचना व राजसत्ता उलथून टाकण्याची शक्ती तरुणाईत असून तो ती शक्ती स्मार्ट मोबाईल, संगणकाच्या माहाजालात तर, पोळा, होळी व नवंवर्षाच्या जल्लोषात वाया घालावीत आहे.
– प्रा. वैशाली देशमुख
रा .कुही , जि. नागपुर
7420850376