पद्मयामी चॅरिटेबल ट्रस्ट, संविधान दिन सोहळा समिती व अस्पायर यांच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव व मार्गदर्शन कार्यक्रम
पिंपरीःआजचे शिक्षण हे भुतकाळान्मूख आहे. ते भविष्योन्मुख असायला हवे. शिक्षण क्रांती हीच खरी क्रांती, असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व मराठी विश्वकोष समितीचे सदस्य प्रभाकर ओव्हाळ यांनी व्यक्त केले. राजर्षि शाहू महाराज जयंती निमित्त पद्मयामी बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट, संविधान दिन सोहळा समिती व अस्पायर यांच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हेते. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला विजयकुमार वावगे व ज्येष्ठ शाहीर अंबादास तावरे हे प्रमुख पाहुणे होते तर अध्यक्षस्थानी प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता अनिल सूर्यवंशी होते. अस्पायर संचालिका रत्ना महिंद्र यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षणपद्धतीत बदलाची गरज
ओव्हाळ पुढे म्हणाले की, राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात शिक्षण सक्तीचे आणि मोफत करायला लावले. अस्पृश्य आणि बहुजनांना आदर्श वाटावा म्हणून डॉ. भिमराव आंबेडकरांची करवीर नगरीत मिरवणूक काढली. तुमचा भावी नेता डॉ. आंबेडकर असल्याचे निक्षुन बजावलं. डॉ. बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी राजर्षि शाहू महाराजांनी शिष्यवृत्ती दिली. शाहू महाराजांनी ‘स्त्री’ शिक्षण,
परित्यक्तांना दिलेलं अभय आणि समता, स्वातंत्र्य व बंधुतेची शिकवण डॉ. आंबेडकरांनी राज्य घटनेत नोंदवली. ह्या दोन्हीही महापुरुषांना प्रचलित शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल घडवून आणायचा होता. आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये फक्त महत्वाकांक्षा शिकवली जाते. विद्यार्थ्यांत स्पर्धा निर्माण केली जाते. काल घडलेल्या घटनांची घोकंपट्टी करायला ही शिक्षण पद्धती शिकवते. आजच्या शिक्षण पद्धतीत प्रेमभाव, मानवता शिकवली जात नाही. आज शिकवल्या जाणार्या शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल व्हायला हवा.
मानवतेची जपणूक करावी
विजयकुमार वावगे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासाची संकल्पाना विषद केली. गुणवंत विद्यार्थ्यांनी महापुरुषांचा विचार निरंतन जपून, आदर्श मानवतेची जपणूक करावी असे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांनी विचार मांडले. गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी ग्रंथ वाटप करून गौरविण्यात आले. सामाजिक परिवर्तनवादी विचारांची कास धरणारे, लक्ष्मण नरसिंग मुदळे यांचा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर मराठी विश्वकोष समितीवर निवड झाल्याबद्दल प्रभाकर ओव्हाळ यांनाही सन्मानीत करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अस्पायर संचालक पांडुरंग वाघमारे, रत्ना महिंद्र, पद्मयामी बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टच्या वैशाली उबाळे, शत्रुघ्न सोनवणे, तर संविधान दिन सोहळा समितीचे विजय गेडाम, राहुल आंबोरे, कैलास लोखंडे, रतन गायकवाड, संदीप झेंडे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानदेव रणसूर यांनी, तर आभार विष्णू मांजरे यांनी मानले.