आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये निवडक शोधनिबंधाचे सादरीकरण
पिंपरी : आजच्या युगात संशोधन फक्त प्रयोगशाळेपुरते मर्यादित न राहता ते प्रत्यक्षात अंमलात येणे ही काळाची गरज आहे. त्या दिशेने विषयामध्ये संशोधन व्हावे, असे मत आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रभात रंजन यांनी केले. आकुर्डी येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात इमर्जिंग ट्रेंड इन सायन्स इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नालॉजी या आशयाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. रंजन बोलत होते. यावेळी डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलनाचे संचालक कर्नल एस. के. जोशी, गाझी विद्यापीठ तुर्कीचे प्राध्याक डॉ. रमजान वायदंळ, एस. आर. विद्यापीठ मद्रासचे प्राध्यापक डॉ. सुभांशु शेखर दास, प्राचार्य डॉ. बी. एस. बाळपगोळ, उपप्राचार्या डॉ. पी. मालती व परिषदेचे उपकार्यवाहक डॉ. कैलास शॉ आदी उपस्थित होते. परिषदेबाबत संकुलनाचे चेअरमन आमदार सतेज डी. पाटील व कर्नल एस. के. जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.
संशोधकाने सद्यस्थितीवर भर द्यावा
डॉ. रंजन म्हणाले की, आजच्या संशोधकाने संशोधनासाठी सद्यस्थितीतील समस्यांवर भर द्यावा. त्या विषयातील समस्यावरील उपायासाठी संशोधन करावे. तसेच तंत्रज्ञानाचा उपयोग लक्षित विकासासाठी व्हावा व तंत्रज्ञानावर लोकांनी विश्वास ठेवून त्याचा आपल्या दैनंदिन वापरात उपयोग करावा. कर्नल जोशी म्हणाले की, आजच्या स्पर्धेच्या काळात महाविद्यालयाची ओळख ही फक्त त्या महाविद्यालयातील होणार्या संशोधनावर होणार आहे. तरी महाविद्यालयात संशोधन संस्कृती रुजविणे व जोपासणे ही काळाची गरज होऊन बसली आहे.
परिषदेची माहिती डॉ. शॉ यांनी दिली. या परिषदेमध्ये एकूण 250 शोधनिबंध आले होते. त्यापैकी निवडक 100 शोधनिबंधाचे सादरीकरण येत्या दोन दिवसात होणार आहे. डॉ. बाळगोपाळ यांनी प्रास्ताविक केले. प्रा. हनी विल्यमस् यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मालती यांनी आभार मानले. प्राचार्य डॉ. बी. एस. बाळपगोळ व उपप्राचार्या डॉ. पी. मालती यांनी केले. परिषदेचे नियोजन आमदार सतेज डी. पाटील व कर्नल एस. के. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.