आजच्या युगातील समाजप्रेमी कृष्ण

0

व्यंगचित्रकार मंगेशजी तेंडुलकरांसोबत माझा तसा जुना संबंध… त्यांच्याद्वारे लावले जाणारे व्यंगचित्र प्रदर्शन पाहणे, त्यांना भेटणे, असा हा एक दर्शक म्हणून तेंडुलकरजी माहीत होते. गतवर्षी रक्षाबंधनाच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पुणे महानगराने ई-कचरा व प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावण्याचे अभियान केले होते. पुण्याच्या 36 नगरांमधून हे अभियान होणार होते, यात कोथरूड नगरातून या प्लास्टिक कचरा व ई-कचरा केंद्राचे उद्घाटन व सर्व समाजाला आवाहन-मार्गदर्शन करण्याची विनंती करायला मंगेशजी तेंडुलकरांकडे माझे जाणे झाले. त्याआधी फोनवर वेळ घ्यावी म्हणून फोन केला, ते म्हणाले केव्हाही या, जवळपासच असतो… ठरल्यावेळेप्रमाणे मी मंगेशजींच्या घरी गेलो. तिथे गेल्यावर अत्यंत व्यवस्थित आवरलेलं घर, प्रसन्न आणि प्रेमळ मंगेशजींचे दर्शन झाले. त्या भेटीत मंगेश तेंडुलकरांनी आम्ही करत असलेल्या कामाबद्दल आम्हाला योग्य त्या सूचना केल्या आणि स्वतः विज्ञानाचे विद्यार्थी असल्याने ई-कचर्‍यामुळे होणारे दुष्परिणामही सांगितले. वैयक्तिकदृष्ट्या आम्ही त्यांच्या 1/3 वयाचे होतो, पण अत्यंत तन्मयतेने त्यांनी आम्हाला समजून घेतले. आम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे ते सांगितले आणि पुढील कार्यक्रमाची वेळ पक्की करून आम्ही परतलो.

कार्यक्रमाचा दिवस उजाडला. आम्ही सर्व तयारी केली होती आणि कार्यक्रमाच्या दिवशी ठरलेल्या वेळेवर मंगेश तेंडुलकर पोहोचले. त्यांची ब्रँड असलेली ती लाल रंगाची दुचाकी घेऊन ते कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले. हेल्मेट घातलेले, स्वच्छ असलेली मोटारसायकल आणि त्यावरचे तेंडुलकर आले… आम्ही त्यांना कार्यक्रमात थोडे बोला असे असे सांगून ठेवले होते. त्यानुसार त्यांनी छोटेखानी भाषणही केले. आज आम्ही करत असलेल्या कामाची आवश्यकता त्यांनी उपस्थितांना सांगितली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघच हे करू शकतो, अशी शाब्बासकीची थापही त्यांनी आम्हाला दिली. या कार्यक्रमानंतर आमच्या 15 ते 19 वयोगटांतील स्वयंसेवकांचे ते आजोबा रूपाने त्यांच्यात सामील झाले. सर्वांच्या विनंतीनुसार त्यांनी फोटोही घेऊ दिले. त्यानंतर वैयक्तिक एक दोन विषयांसाठी माझे त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले. लोकमान्य बँकेचे किरण ठाकूर यांच्यासमवेत बालगंधर्वमध्ये भेट झाली. त्यांच्यासोबत तेव्हा दिलखुलास गप्पा झाल्या. किरण ठाकूर यांनी मोठ्या विनयाने मंगेशजी यांची विचारपूस केलेली आठवली आज…

माझ्या कन्येला त्यांच्यासोबत बोलायचे होते ते त्यांनी मान्य केले आणि स्वत:सोबत एक फोटोही काढू दिला. पुण्याच्या जिंदादिल व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश असावा, रस्त्यावरील वाहतूक गोंधळाचा गोवर्धन स्वतः च्या कुंचल्याद्वारे पेलून नेणारा आजच्या युगातील एका समाजप्रेमी कृष्णाचं रूप म्हणून मला ते आजही स्मरतात आणि इथून पुढेही कायमच स्मरत राहतील.
किरण भाटिया, स्वयंसेवक, रा. स्व. से., पुणे