आजपासूनच मान्सूनची केरळात चाहूल

0

मुंबई । यंदा नैर्ऋत्य मान्सून केरळात नियोजित तारखेच्या चार ते पाच दिवस अगोदरच दाखल होण्याची शक्यता आहे. केरळात 29 मे रोजी मान्सून दाखल होईल, असा अंदाज नुकताच भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवला आहे. स्कायमेटनेही असेच भाकीत व्यक्त करत मान्सून 26 ते 30 मेपर्यंत केरळात सक्रिय होईल असे म्हटले आहे. मोसमी वार्‍याचा सध्याचा वेग, हिंदी महासागरातील हालचाली आणि अरबी समुद्रातील तापमान यावरून मान्सून 26 मेपर्यंत केरळात दाखल होण्याची शक्यता दुणावली असल्याचे मत हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

दोन दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाची हजेरी
आयएमडीनुसार, बंगालचा उपसागर व लगत चक्रवात असल्याने मान्सूनची वाटचाल 24 तासांत कामोरिनच्या दक्षिण भागात, बंगालच्या उपसागरात होण्यास अनुकूल स्थिती आहे. स्कायमेटच्या मते, केरळ आणि कर्नाटकात दोन दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाची हजेरी आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून आर्द्रतायुक्त वारे वाहत असून त्यामुळे या भागात आणखी पाऊस होईल. ही स्थिती आगामी 24 तास कायम राहिली तर केरळात मान्सून 26 मे ते 29 मे या काळात दाखल होईल.

5 ते 6 जूनपर्यंत कोकणात आणि गोव्यात आगमन
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील सध्याचे वातावरण पाहता केरळात 26 ते 28 मे रोजी मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. 5 ते 6 जूनला कोकण किनारपट्टी आणि गोव्यात मान्सूनच्या आगमनाची शक्यता आहे. 7 ते 10 जूनदरम्यान मुंबई आणि घाटमाथ्यावर मान्सून हजेरी लावेल. 9 ते 10 जून मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होईल, तर 8ते 10 जूनला मराठवाडा आणि विदर्भात मान्सूनच्या आगमनाची शक्यता असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.