आजपासून आयपीएलचा रोमांच

0

हैदराबाद। आयपीएलच्या दहाव्या सत्राचा प्रारंभ बुधवारपासून होत आहे. 47 दिवस चालणार्‍या या रोमांचक सोहळ्याची सुरुवात गतविजेते सनरायझर्स हैदराबाद आणि उपविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यातील लढतीने हैदराबादेत होत आहे. उद्घाटनाच्या समारोहाची जय्यत तयारी झाली असून अनेक बहारदार कार्यक्रमाचे यावेळी आयोजन होणार आहे. सनरायझर्सने गेल्या सत्रात बंगळूरचा पराभव करून पहिल्यांदाच अजिंक्यपद पटकावले होते. हे अजिंक्यपद टिकवण्याचे आव्हान डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळणार्या हैदराबादसमोर असणार आहे. यंदाचे आयपीएल दुखापतग्रस्त असून अनेक महत्त्वाचे खेळाडू यंदा बाहेर असणार आहेत. यंदाच्या हंगामासह स्पर्धेचा दहा वर्षांचा टप्पा पूर्ण होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वाचा अविभाज्य भाग झालेल्या या स्पर्धेचा दहावा हंगाम बुधवारपासून सुरू होत आहे. स्पॉट फिक्सिंग आणि अन्य गैरव्यवहारांनी गालबोट लागलेल्या या स्पर्धेचा चेहरामोहरा लोढा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीनंतर बदलला आहे. 2008 मध्ये या स्पर्धेची सुरुवात झाली होती. आता दहाव्या हंगामाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाची देखील धामधूम असणार आहे. उद्घाटन सोहळ्यात अनेक कलाकारांचे बहारदार कार्यक्रम होणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

तगड्या खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष
14 कोटींची बोली मिळवणारा इंग्लंडचा बेन स्टोक्स यंदाच्या आयपीएलचे आकर्षण आहे. स्टोक्सच्या येण्याने तळाचे स्थान राखणार्‍या पुण्याचे नशीब बदलते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. केवळ एका स्पर्धेचा चमत्कार नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादवर आहे. बेंगळुरू संघाला दुखापतींनी ग्रासले आहे. पंजाब संघातही बरेच फेरफार झाले आहेत. दुखापतीतून सावरलेला रोहित शर्मा मुंबई इंडियन्सला विजयपथावर नेण्यासाठी सज्ज झाला आहे. संघात आमूलाग्र बदल झालेला दिल्लीचा संघ ठसा उमटवण्यासाठी आतुर आहे. कोलकाता लौकिकाला साजेसे सातत्य राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. सनरायझर्सची अत्यंत धारदार गोलंदाजी ही विशेषता आहे. 2016 च्या सत्रात त्यांच्या गोलंदाजांनी तब्बल 88 विकेट घेतल्या होत्या. बांगलादेशचा मुस्तफिजुर रेहमान हा त्यांचा हुकमी एक्का. तो एक महिना संघासाठी उपलब्ध असेल. याशिवाय टीम इंडियाचे अनुभवी भुवनेश्‍वरकुमार आणि आशिष नेहरा त्याच्या साथीला आहेत. यावर्षी हैदराबादने पुन्हा गोलंदाजांवर भर दिला असून ख्रिस जॉर्डन, बरिंदर शर्न आणि मोहम्मद सिराज यांचा नव्याने समावेश केला आहे. अत्यंत बलाढ्य असणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळूरसमोर (आरसीबी) यंदा विराट कोहली, ए. बी. डीविलियर्स या अत्यंत महत्त्वाच्या खेळाडूंच्या दुखापतीची चिंता आहे. 2012 आणि 2014 चे चॅम्पियन असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाला गेल्या सत्रात पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. गौतम गंभीर, रॉबिन उथप्पा, युसुफ पठाण या भारतीय संघातील माजी स्टार्सवर केकेआरची प्रामुख्याने मदार आहे. यंदा कामगिरी सुधारण्याचे ‘गंभीर’ आव्हान केकेआर समोर आहे. अनेक स्टार खेळाडू असलेल्या दिल्लीला आतापर्यंत एकदाही फायनल गाठता आलेली नाही. 2012 च्या सत्रात त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला होता, हीच सर्वोत्तम कामगिरी. गेल्या सत्रात आठ संघांत ते सहाव्या स्थानावर होते. यंदाही जे. पी. ड्युमिनी, क्युटन डी कॉकसारखे प्रमुख फलंदाज नसल्याने दिल्लीसमोर मोठी चिंता आहे. यंदा तामिळनाडूच्या एम. अश्‍विनला पाच कोटी रुपयांत खरेदी केले असून त्याच्या कामगिरीवर खास लक्ष असेल.

यंदा महाराष्ट्रातही होणार लढती
राज्यातील दुष्काळामुळे गेल्या वर्षी आयोजनाची संधी गमावलेल्या मुंबई आणि पुण्यात यंदा इंडियन प्रीमिअर लीगची जत्रा भरणार आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात प्रत्येकी सात लढती होणार आहेत. हैदराबादमध्ये 21 मे रोजी अंतिम मुकाबला रंगेल.

एकूण 14 संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून दहा वेगवेगळ्या मैदानावर सामने खेळवण्यात येतील. प्रत्येक संघाची अन्य संघांशी एक लढत घरच्या मैदानावर तर दुसरी प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर होईल. मुंबई, पुण्यासह बंगळुरू, हैदराबाद, दिल्ली, इंदूर, कानपूर, कोलकाता, मोहाली, राजकोट येथे स्पर्धेच्या लढती होतील. 2011 नंतर इंदूरला आयपीएल सामन्यांच्या आयोजनाची संधी मिळणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या तीन लढतींसाठी इंदूर घरचे मैदान असणार आहे.

वॉटसनकडे बंगळुरुचे नेतृत्व
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू शेन वॉटसन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे नेतृत्व करणार आहे. विराट कोहली आणि डिव्हिलीयर्स आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीत. त्यामुळे शेन वॉटसनकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे नेतृत्व असेल. आयपीएलच्या दहाव्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ दुखापतींमुळे बेजार झाला आहे. विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या रांची कसोटीत खांद्याला दुखापत झाली. के. एल. राहुलच्या खांद्याला दुखापत झाल्याने त्यावर सर्जरी करण्यात येणार आहे. फॉर्मात असलेला राहुल आयपीएलच्या एकाही सामन्यात खेळणार नसल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. या सामन्यात बंगळुरुच्या संघासमोर माजी विजेत्या सनरायझर्स हैदराबादचे आव्हान असणार आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत डिव्हिलीयर्स संघाचे नेतृत्व करेल, असे बंगळुरु संघाच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले होते. डिव्हिलीयर्सला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यास वेळ लागेल, असे बंगळुरु संघाचे प्रशिक्षक डॅनिअल व्हिटोरी यांनी म्हटले आहे.