डिकसळ । उजनी जलाशयावरील पाणीपट्टी थकीत शेतकर्यांच्या वीजपंप जप्त करण्याच्या कारवाईला आजपासून (दि. 6) सुरुवात करणार असल्याची माहिती उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे शाखा अभियंता आर. एम. गायकवाड यांनी दिली.उजनीच्या निर्मितीपासूनच काही शेतकर्यांनी पाणीपट्टी भरलेली नाही. तर काही शेतकर्यांनी तीन अश्वशक्ती (हॉर्सपॉवर) मोटारीचे जोड दाखवून पाच आणि दहा अश्वशक्तीच्या मोटारी चालवत आहेत. तर काही काही शेतकर्यांनी तर अनधिकृत पाणीउपसा सुरू केला आहे. उजनीच्या पाण्याचा उपसा हा अनधिकृतरित्या मोठ्या प्रमाणित होत असल्याचे निदर्शनात आल्याने यावरही कारवाई होणार असल्याचे आर. एम. गायकवाड यांनी सांगीतले.
ठिबक सिंचनाच्या अटीला हरताळ
सोलापूर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील हे राज्यातील सर्वात मोठे पाणीसाठ्याचे धरण आहे. या धरणावर पुणे, नगर आणि सोलापूर या जिल्ह्यातील शेतीव्यवसाय अवलंबून आहे. त्यामुळे उजनीच्या पाण्यासाठी सतत आंदोलने होत असतात. दरम्यान, एकीकडे पाणी वाचवण्याचा संदेश देत असतानाचा उजनीच्या पाण्याचा होणारा बेकायदेशीर पाणी उपसा हा सुद्धा मोठा विषय आहे. उजनीच्या पाण्यावर सिंचन करणार्या शेतकर्यांना ठिबक सिंचनाची मोठी अट आहे. मात्र, हा अटीला हरताळ फासला आहे.
कोट्यवधीची पाणीपट्टी थकीत
जिल्ह्यातील इंदापूर, दौंड या पाणलोट क्षेत्रातील शेतकर्यांकडे उजनीच्या पाणी सिंचनाची कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. त्यांना वारंवार थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी कळवुनही ती भरली जात नाही. याबाबत शेतकर्यांना वेळोवेळी नोटीसाही दिल्या आहेत. तरीही पाणीपट्टी भरली जात नाही. म्हणून आज(दि. 6) पासून ज्या शेतकर्यांची पाणीपट्टी थकीत आहे, त्यांचे वीज पंप जप्तीची कारवाई करण्याचा आदेश दिला आहेत.उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील उपसा सिंचन योजना आणि खासगी शेतकरी यांच्याकडे पळसदेव आणि इंदापूर उप विभागाची सुमारे पावणे चार कोटींच्या आसपास थकबाकी आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस बंदोबस्तात होणार आहे.