आजपासून उमवीचे नाव बहिणाबाई चौधरी विद्यापीठ

0

नागपूर-खानदेश कन्या कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास देण्यात यावी अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती अखेर मागील अधिवेशनात सरकारने विद्यापीठास कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याबाबत घोषणा करण्यात आली होती. दरम्यान नागपूर पावसाळी अधिवेशनात नामकरण विधेयक मंजुरीसाठी ठेवण्यात आले, त्यास बहुमताने मंजूरी देण्यात आली. त्यामुळे आजपासून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नामकरण बहिणाबाई चौधरी असे करण्यात आले आहे.

शिक्षणमंत्री यांना वाढदिवसाची भेट
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा आज वाढदिवस आहे आणि आजच  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कवियत्री बहिणाबाई चौधरी असे नामकरण  झाल्याने ही शिक्षणमंत्री यांना वाढदिवसाची अनोखी भेट असल्याचे मत नामकरण विधेयकावर चर्चा करतांना व्यक्त करण्यात आले. गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, राष्ट्रावादीचे विधान परिषद प्रतोद हेमंत टकले, आमदार स्मिता वाघ यांनी या विधेयकावर आपले मत व्यक्त करत उमवीच्या नामकरणास पाठिंबा दिला.

महाराष्ट्रासाठी भूषणावहबाब

खानदेश कन्या कवियत्री बहिणबाई चौधरी यांचे नाव मोठ्या शैक्षणिक संस्थेस देणे ही बाब नक्कीच महाराष्ट्रासाठी भूषणावह बाब आहे. पुरोगामी महाराष्ट्राला साजेशी कामगिरी आज सरकारने केली आहे असे मत राष्ट्रवादीचे प्रतोद हेमंत टकले यांनी व्यक्त केले.

शासनाचे आभार 

तमाम खानदेशवासीय जनतेकडून मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांचे आभार आमदार स्मिताताई वाघ यांनी मानले. आज खानदेशच्या जनतेसाठी खूप मोठा दिवस असल्याचे मत आमदार स्मिताताई वाघ यांनी सांगितले.

चंद्रकांत रघुवंशी यांचे अहिराणीत भाषण 

नंदुरबारचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नाव बहिणाबाई चौधरी असे करण्यात आल्याने आपले मत व्यक्त करतांना खानदेशी भाषा अहिराणीत विधानपरिषदेत भाषण केले. त्यामुळे विधान परिषदेत अहिराणीमय वातावरण निर्माण झाले होते.