आजपासून घुमणार ले पंगा

0

मुंबई । मागील चार सत्रांमध्ये धुमशान करणार्‍या प्रो लीग कबड्डी स्पर्धेच्या पाचव्या सत्रातील सामन्यांना शुक्रवारपासून हैदरबादमध्ये सुरुवात होत आहे. सुमारे 13 आठवडे रंगणार्‍या या स्पर्धेत यंदाच्या मोसमापासून आणखी चार नवीन संघाचा समावेश करण्यात आला. दोन टप्प्यामंध्ये रंगणार्‍या या स्पर्धेत पारितोषीकाच्या रकमेत घसघशीत वाढ करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला 3 कोटी आणि उपविजेत्या संघाला 1 कोटी 80 लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे

दोनवेळा ही स्पर्धा जिंकणार्‍या पाटणा पायरेट्स संघापुढे लीगमधील जुन्या संघासह नवीन संघ कसे आव्हान देतात याची सगळ्यांना उत्सुकता असेल. यावेळी स्पर्धेच्या आरखड्यात बदल करण्यात आला आहे. लीगमधील संघाची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक संघाला 15 विभागीय आणि सात आंतर विभागीय सामन्यांचा अडथळा पार करावा लागणार आहे. प्ले ऑफमध्ये दोन एलिमेनटर्स आणि तीन क्वॉलीफायर्स असतील. अंतिम सामना चेन्नईमध्ये रंगणार असून तेलुगु टायटन्स आणि तामिळ थलैवाज संघातील सामन्याने लीगचा शुभारंभ होईल. लीगमधील नवीन संघ आणि लिलावामुळे खेळाडूंमध्ये झालेल्या बदलांमुळे यावेळी अनेक अनपेक्षित निकाल समोर येण्याची शक्यता आहे.