1 जूनपासून ‘चॅम्पियन्स’चा रोमांच

0

लंडन । 1जून पासून चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचा रोमांच सुरु होत असून इंग्लड आणि बांगलादेश यांच्यातील सामन्याने स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रमवारीतील अव्वल आठ संघ मिनी वर्ल्डकप म्हणून ओळखल्या जाणार्‍या चॅम्पियन्स करंडकासाठी मैदानात झुंजणार आहेत. दरम्यान गतविजेता टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये असून सराव सामन्यातील दोन्ही विजयाने यावर्षी देखील विजेतेपद पटकाविण्याचा संघाचा मानस आहे. भारतीय संघाने सरावसामन्यात दमदार कामगिरी केली असून स्पर्धेतील पहिला सामना रविवारी पाकिस्तानसोबत रंगणार आहे. या आठ संघातील कोणता संघ चॅम्पियन ठरेल, याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. 2013 मध्ये रंगलेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकावले होते.

स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आठ संघाची दोन गटात वर्गवारी करण्यात आली आहे. ‘अ’ गटात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांग्लादेश. ‘ब’ गटात भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. चॅम्पियन्स कंरंडक स्पर्धेच्या पहिल्या फेरीत प्रत्येक संघ आपल्या गटातील संघाशी प्रत्येकी एक सामना खेळेल. त्याप्रमाणे प्रत्येक साखळी सामन्यात प्रत्येक संघ तीन सामने खेळताना दिसेल. साखळी सामन्यात प्रत्येक सामन्यात विजयी संघाला दोन गुण दिले जातील.

बॅटमध्ये संगणकीकृत चीप!
या स्पर्धेमध्ये फलंदाजांच्या बॅटमध्ये संगणकीकृत चीपचा प्रयोग होणार आहे. यंदाच्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेमध्ये क्रिकेट चाहत्यांना क्रिकेटच्या मैदानावर नव्या तंत्रज्ञानाचे दर्शन घडणार आहे. या स्पर्धेत काही फलंदाज विशेष चीप असणारी बॅट घेऊन मैदानात उतरणार आहेत. मैदानात खेळत असताना प्रतिस्पर्ध्यांकडून फलंदाजांविरोधात कशी रणनिती आखली जाते, ते समजून घेणे सुलभ करण्यासाठी बॅटमध्ये कम्प्युटराइज्ड चीप तंत्रज्ञानाचा प्रयोग करण्यात येणार आहे. प्रत्येक संघातील तीन खेळाडू या चीपचा वापर करणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय संघातील रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे नाविण्यपूर्ण चीप असणारी बॅट घेऊन मैदानात उतरण्याची शक्यता आहे. भारतीय संघ स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध पहिला सामना खेळणार असून पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात हा नवा प्रयोग करण्यात येणार आहे. बॅटमध्ये वापरण्यात येणार्‍या चीपमुळे फलंदाजी करताना मैदानातील रणनितीचे संपूर्ण चित्रीकरण रेकॉर्ड होईल.

बांगलादेशचा टीम इंडियाकडून धुव्वा
दुसर्‍या सराव सामन्यात भारताने बांगलादेशवर 240 धावांनी दणदणीत विजय मिळविला. भारताने शिखर धवन, दिनेश कार्तिक, हार्दिक पंडया यांच्या दमदार अर्धशतकांच्या बळावर 50 षटकांत 7 बाद 324 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी यांच्या भेदक माऱयासमोर बांगलादेशचा 23.5 षटकांत केवळ 84 धावांत धुक्वा उडवित दणदणीत विजय साकार केला. बांगलादेशने त्याआधीच्या सराव सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 300 हून अधिक धावा जमविल्या होत्या. पण या सामन्यात 325 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या वेगवान मार्‍यासमोर आठव्याच षटकांत 6 बाद 22 अशी त्यांची केविलवाणी स्थिती झाली. आणि नंतर 24 व्या षटकांत त्यांचा डाव 84 धावांत आटोपला.