आजपासून तीन दिवस बँका बंद; या तीन बँका सुरु राहणार

0

मुंबई-बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने आज बुधवारपासून दोन दिवस काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. यामुळे देशभरातील राष्ट्रीयीकृत बँकांमधील कामकाज दोन दिवस ठप्प राहणार असून महिन्याच्या शेवटी हे आंदोलन होत असल्याने पगारालाही विलंब होण्याची शक्यता आहे. मात्र, एचडीएफसी, आयसीआयसीआय, अॅक्सिस, कोटक महिंद्रा या सारख्या खासगी बँकांचे व्यवहार सुरु राहणार आहेत. त्यामुळे या बँकांमधील खातेधारकांना दिलासा मिळाला आहे.

४८ तास आंदोलन
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या झेंड्याखाली नऊ संघटना एकत्रित आल्या आहेत. आंदोलनात जलद वाटाघाटीतून लवकरात लवकर पगारवाढीच्या प्रश्नावर करार करण्यात यावा, पगारात पुरेशी वाढ देताना सेवा शर्तीत सुधारणा करण्यात यावी यासह अन्य मागण्यासांठी हे काम बंद आंदोलन केले जात आहे. आज सकाळी साडे सहा वाजेपासून हे आंदोलन सुरु होणार असून ४८ तास हे आंदोलन सुरु राहील.

आंदोलनामुळे बँकेचे कुठलेही आर्थिक व्यवहार होणार नसून ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून एटीएममध्ये पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र, बँक बंद असल्याने काही तासांमध्येच केंद्रावर खडखडाट जाणवेल, अशी शक्यता आहे. देशभरातील राष्ट्रीयीकृत बँकांमधील सुमारे १० लाख कर्मचारी या काम बंद आंदोलनात सहभागी होतील, असा दावा संघटनेतर्फे करण्यात आला आहे.