आजपासून नवरात्रोत्सव, दुर्गापूजन!

0

उत्सवी वातावरणात रंगणार जागरण

मुंबई  । आज घटस्थापना…नवरात्रीतली पहिली माळ… आजपासून नऊ दिवस नवरात्रीचे… हे नऊ दिवस जागरण, उपवास आणि दांडियाच्या रंगांनी उजळून निघतील. वेगवेगळे रंग ही तर या सणाची खासियत… मग, आवर्जुन आपले कपडेही त्याच रंगाचे असायला हवेत हा अट्टाहास आलाच की! नवरात्रातील प्रत्येक दिवशी येणार्‍या वारानुसार भारतीय ज्योतिष्यांनी प्रत्येक दिवसाचा रंग ठरवलेला आहे. देवीला त्या त्या दिवशी त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते. राज्यातील वेगवेगळ्या देवींच्या संस्थानात या दिवसात तेथील देवींना नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या नेसवल्या जातात. पण पुढे हा प्रकार एक ट्रेन्ड म्हणून बघितला जाऊ लागला. इतका की, नवरात्रात आता महाराष्ट्रातील अनेक शहरांतील महिला-तरूणी त्या दिवसाच्या त्या ठरावीक रंगाचे कपडे किंवा साड्या परीधान करू लागल्या.

महिलांमध्येही रंगाचे कौतुक
वेगवेगळ्या सरकारी-खाजगी कार्यालयांमध्ये ठरवून त्याच रंगांचे कपडे परीधान केले जाऊ लागले. गावांगावांतील बँक किंवा तत्सम स्त्रीबहुल कार्यालयांमध्ये नवरात्रात असे एकरंगी दृश्य असते. लोकल ट्रेन्स, सरकारी बिन-सरकारी ऑफिसे, महिलामंडळे एवढेच काय पण हॉस्पिटल्सही या रंगांच्या साड्यांनी रंगून जातात. आता मुंबईच नाही तर, पुणे, नाशिक, धुळे जळगाव अशा अनेक गावांत नवरात्रीच्या नऊ दिवसांत रंगांची ही उधळण पहायला मिळते. अलिकडे कॉलेजेसमध्येही हा ट्रेन्ड बघायला मिळतो. त्यामुळे हा उत्सव आणखीन कलरफुल होताना दिसतो.

पेशवाईपासून रंगाची मूळ संकल्पना
ही नवरात्रीच्या दिवसांच्या नऊ रंगांची कल्पना बहुसंख्य सामान्य आणि तमाम नोकरदार स्त्रीवर्गात जरी लोकप्रिय झाली असली, तरी रंगांची मूळ कल्पना एकोणीसाव्या शतकात, अगदी पेशवाईच्या काळातही अस्तित्वात होती. उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारचा रंग केशरी, चंद्र पांढरा म्हणून सोमवारचा रंग पांढरा, मंगळ लाल म्हणून मंगळवारचा रंग लाल या रीतीने नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यातल्या दिवसाचे रंग ठरवले आहेत. बुधवारचा निळा, गुरुवारचा पिवळा, शुक्रवारचा हिरवा आणि शनिवारचा रंग करडा असतो. आठवडा संपल्यानंतर नवरात्रातले शेवटचे दोन दिवस उरतात. त्यांच्यासाठी मोरपिशी हिरवा, जांभळा, आकाशी आणि गुलाबी हे रंग राखून ठेवले गेले.

॥नवरात्र पहिली माळ॥

बासरास बैसलीसजाऊनी सरस्वती
दर्शनास नित्य येऊ मी कसा तुझे प्रति
गुंतलो प्रपंच पत्नी पुत्र व्याप हा घरी
उदर भरण भाव यास करीत रोज चाकरी
ओढ अंतरात म्हणुन योजला उपाय मी
सांगतो इथुनी ऐक नीट कान देऊनी
वाहत्या जलास मंत्रुनी जलास सोडीतो
येत ते तुझ्या प्रति मी स्नान योग साधितो
धुप दीप आरतीस प्रज्वलीत व्हावया
त्वरीत अग्नी धावतो ग पुण्यलाभ घ्यवया
भोजनास शाकपाक न्यावयास धावतो
स्वाद भुक वासनेस मोदयात वाटतो
कमला वाहतो पदावरी तुझ्याच येथुनि
दिव्य दृष्टि मागतो अनंत नम्र होऊनी