आजपासून बँकेचे व्यवहार महागणार

0

नवी दिल्ली ।  भारतीय स्टेट बँकेने आपले सर्व्हिस चार्ज पुन्हा वाढवले आहेत. एसबीआयचे हे नवीन नियम येत्या 1 जूनपासून लागू होणार आहेत. नवीन नियमांनुसार, एसबीआयच्या ग्राहकांना आता अनेक सेवांसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

नोटा बदलण्यासाठी लागणार 2 ते 5 रुपये
फाटलेल्या, कापलेल्या आणि गळालेल्या नोटा बदलण्यासाठी एसबीआय 5 रुपयांपर्यंत चार्ज लावणार आहे. 20 हून अधिक नोटा किंवा 5000 रुपयांहून अधिक रक्केमेच्या फाटलेल्या नोटा बदलताना हे दर आकारले जाणार आहेत. एखाद्या ग्राहकाने 20 नोटांपर्यंत बदलण्यासाठी आणलेल्या असतील आणि त्या नोटांची एकूण किंमत 5000 रुपयांपेक्षा कमी असल्यास दर लागणार नाही. तसेच ती रक्कम 5 हजार रुपयांच्या आत असल्यास आणि नोटांची संख्या 20 हून अधिक असल्यास प्रत्येक जास्तीच्या नोटवर 2 रुपयांप्रमाणे दर आकारला जाणार आहे. यासोबतच, ग्राहकांवर सर्व्हिस टॅक्स अतिरिक्त लादले जातील. नोटा 20 हून अधिक आणि रक्कमही 5000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास प्रत्येक जास्तीच्या नोटवर 5 रुपये आकारले जाणार आहेत.

बेसिक सेव्हिंग्स खात्यावर लागणार चार्ज
एसबीआय 1 जूनपासून आपल्या बेसिक सेव्हिंग खाते धारकांना सुद्धा सर्व्हिस चार्जेस लावणार आहे. यानुसार, पैसे काढण्याची मर्यादा 4 केली जाणार आहे. यात एटीएमवरून काढल्या जाणार्‍या रक्कमेचा देखील समावेश आहे.

4 पेक्षा अधिकवेळा पैसे काढल्यास 20 रुपये
ग्राहकाने मर्यादित 4 पेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास ते बँकेतून असो वा एटीएममधून त्याला दर लावले जाणार आहेत. यात 4 हून अधिक प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर 20 रुपये अतिरिक्त भरावे लागणार आहेत. त्यातही सर्व्हिस टॅक्स अतिरिक्त लादला जाणार आहे.

एटीएम मधून पैसै काढण्यासाठीही चार्जेस
एसबीआय ग्राहकाने मर्यादेपेक्षा जास्त वेळा एटीएममधून पैसे काढल्यास त्यांना प्रत्येक व्यवहारासाठी 10 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यातही सर्व्हिस टॅक्स वेगळा भरावा लागेल. 4 व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर एसबीआय ग्राहकाने इतर बँकांच्या एटीएममधून पैसे काढल्यास प्रत्येक व्यवहारासाठी 20 रुपये मोजावे लागणार आहेत.

डेबिट कार्ड आता मोफत नाही
आतापर्यंत प्रत्येक खात्यासाठी मोफत दिला जाणारा एटीएम डेबिट कार्ड यापुढे घेण्यासाठी एसबीआय पैसे घेणार आहे. बँका हा नियम सामान्य बचतखाते धारकांना सुद्धा लागू करण्याचा विचार करत आहे. बँकांकडून रुपे कार्ड मोफत दिले जाईल. या व्यतिरिक्त मास्टर किंवा व्हिसा डेबिट कार्ड घेण्यासाठी ग्राहकांकडून पैसे उकळणार आहे.