आजपासून बळीराजा गेला संपावर

0

मुंबई । अनेक शहरात उद्यापासून भाजीपाला, दूध आणि दैनंदिन आवश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू शकतो. कारण आजपासून बळीराजा संपावर गेला आहे. इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी संपावर जाण्याची घटना घडत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेतकर्‍यांची बैठक निष्फळ ठरल्यानंतर शेतकर्‍यांनी संपावर जाणार असल्याचे जाहीर केले होते. पीक काढायचे नाही, दूध शहरापर्यंत पोहोचवायचे नाही आणि कोणत्याही शेतमालाची विक्री करायची नाही, असा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचाही पाठिंबा
शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, तसेच शेतकर्‍यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी राज्यव्यापी संपाचा एल्गार पुकारला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही या संपाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. हा संप मागे घेण्यासाठी कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल अहमदनगरमधील पुणतांबा गावात आंदोलक शेतकर्‍यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री भेटीचा प्रस्ताव दिला. त्यानंतर मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे आज 1 जूनपासून शेतकर्‍यांनी दूध आणि भाजीपाला विक्री न करण्याची भूमिका घेतली आहे.

सातबारा कोरा करा
शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा, दुधाला 50 रूपये लीटर भाव मिळावा, शेतकर्‍यांना पेन्शन योजना लागू करावी, शेतीसाठी अखंडीत मोफत वीजपुरवठा, ठिबक आणि तुषार सिंचनाला 100 टक्के अनुदान मिळावे या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

दिशाभूल करू नका
शेतकर्‍याला संपावर जाण्यासाठी जे लोक चिथावणी देत आहेत ते शेतकर्‍यांचे नुकसान करत आहेत. संपावर जाऊन शेतकरी काही साध्य करू शकत नाहीत. उलट त्यांचा पेरण्यांचा दहा दिवसांचा हंगाम गेला तर त्यांचे पुढचे संपूर्ण वर्ष वाया जाणार आहे. या पद्धतीने शेतकरी उद्ध्वस्त होईल. त्यामुळे अशा चिथावणीला शेतकर्‍यांनी बळी पडू नये. शेतकर्‍यांच्या संपाने काहीही बिघडणार नाही अशा आशयाचे विधान मी केलेले नाही. शेतकर्‍याला संपावर जाण्यासाठी कोणीही त्यांची दिशाभूल करू नये, असे आवाहन मी करतो.
माधव भंडारी, प्रवक्ते भाजप