नवी दिल्ली: एअरटेल, व्होडाफोन-आयडीया सिमकार्डधारकांसाठी थोडीसी नाराज करणारी बातमी आहे. सिमकार्ड कंपन्यांनी डेटा आणि कॉलिंगच्या दरात आजपासून वाढ केली आहे. एअरटेल आणि व्होडाफोन या दोन्ही कंपन्यांनी आधीपासूनच असलेल्या काही प्लानच्या किंमती वाढवल्या आहेत. तर काही नवीन प्लान लाँच केले आहेत.
एअरटेल आणि व्होडाफोनने १६९ रुपये आणि १९९ रुपयांचे प्लान बंद केले आहेत. २८ दिवस कालावधीच्या या प्लानमध्ये दररोज अनुक्रमे १ जीबी आणि १.५ जीबी डेटा दिला जात होता. आता कंपन्यांनी या प्लानऐवजी एक नवीन प्लान लाँच केला आहे. या नव्या प्लानची किंमतही जास्त आहे. हे प्लान बंद करून कंपनीने २४८ रुपयांचा प्लान लाँच केला आहे. यामध्ये दररोज १.५ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे. या प्लानमध्ये फ्री आणि अमर्यादित कॉलिंगची सुविधा फक्त एअरटेल टू एअरटेलवर मिळणार आहे. अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी १००० मिनिट मिळतील. ते संपल्यानंतर तुम्हाला अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी प्रतिमिनिट सहा पैसे द्यावे लागतील.
आता एअरटेलचा दररोज एक जीबी डेटा देणारा कोणताही प्लान नाही. २८ दिवस कालावधी असलेल्या सर्वात स्वस्त २४८ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा वापरायला मिळणार आहे. दिवसाला सर्वाधिक डेटा वापर करणारे ग्राहक २९८ रुपयांचा प्लान घेऊ शकतात. त्यात दररोज २ जीबी डेटा देण्यात आला आहे. याआधीच्या २४९ रुपयांच्या प्लानऐवजी हा प्लान लाँच करण्यात आला आहे. याशिवाय ८४ दिवसांचा कालावधी असलेला ५९८ रुपये आणि ६९८ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज अनुक्रमे १.५ जीबी आणि २ जीबी डेटा मिळणार आहे. तर ३६५ दिवस कालावधी असलेल्या २३९८ रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला दररोज १.५ जीबी डेटा मिळणार आहे.