आजपासून विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालये होणार सुरु 

 

जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशाळा व संलग्नित जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हयातील महाविद्यालयांचे नियमित वर्ग उद्या मंगळवार दि. १ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या अटी व शर्तींच्या अधिन राहून सुरु होत आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार १ फेब्रुवारी पासून महाविद्यालयातील नियमित वर्ग प्रत्यक्षरित्या सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार विद्यापीठाने जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून नियमित वर्ग सुरु करण्याबाबत परवानगी मागितली होती. या तीनही जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शक सूचना देऊन नियमित वर्ग व वसतिगृहे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी १०० टक्के उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. कोविड-१९ या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रत्यक्ष उपस्थितीची परवानगी राहील. दोन्ही डोस न झालेल्या विद्यार्थ्याना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, परीक्षा या विद्यापीठ अनुदान आयोग व महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार घ्याव्यात, क्रीडा स्पर्धा, स्नेहसंमेलने, आदी सांस्कृतिक कार्यक्रम घेता येणार नाहीत. वर्गात शारीरिक अंतर राखून बैठक व्यवस्था करण्यात यावी. सभा, कार्यशाळा शक्यतो ऑनलाईन घ्याव्यात. वसतिगृहात दोन्ही डोस घेतलेल्यांनाच प्रवेश द्यावा आदी अटी व शर्तींच्या अधिन राहून ही परवानगी देण्यात आली असून विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा.आर.एल.शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी परिपत्रक काढले आहे