जळगाव । जिल्हा परिषदेतील बदली प्रक्रियेला आज 22 मे पासून सुरुवात होत आहे. पहिल्या दिवशी शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांच्या बदल्या होणार आहे. शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख विनंती बदलीसाठी 8 अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे. सर्व बदली प्रक्रिया ही ऑनकॅमेरा होणार आहे. दरम्यान सरकारने शिक्षकांच्या बदल्यांचे नवीन धोरण जाहीर करताना अवघड सर्वसाधारण क्षेत्र अशी वर्गवारी करण्याचे आदेश दिले. प्रशासनानेही स्थळ पाहणी केली. त्यात जिल्ह्यातील 159 अवघड शाळा अवघड क्षेत्रात असल्याचे घोषितही केले आहे. मात्र यात आता काही शाळा तपासल्या नसल्याच्याही तक्रारी झाल्यामुळे या निर्णयाबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम कायम आहे. परिणामी शासनाकडून सूचना प्राप्त होत नाही तोपर्यंत शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत. या प्रक्रियेची गुंतागुंत आणखी वाढल्याने यंदा तरी अवघड क्षेत्र गृहित धरूनच बदल्या होण्याची शक्यता आहे. या दरम्यान काही जिल्ह्यातील शिक्षकांनी या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. दरम्यान सोमवारी विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुखांच्या ’विनंती बदल्या’ होणार आहेत. अवघड क्षेत्र वर्गवारीमुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. ऑनलाइन बदल्यांबाबत सूचना नाहीत.