खा. राजु शेट्टी यांची राहणार उपस्थिती
जळगाव | शासनाने कर्जमाफी जाहीर केली मात्र अद्यापही कर्जमाफीची लाभ शेतकर्यांना मिळालेला नाही. शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा यामागणीसाठी राज्यस्तरीय शेतकरी परिषद २६ सप्टेंबरला जळगाव शहरात होत आहे. राज्यस्तरीय परिषदेस शेतकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थितीचे आवाहनासाठी ‘शेतकरी दिव्य ज्योत यात्रेचे’ आयोजन करण्यात आले आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर आज गुरुवारी २१ रोजी शेतकरी दिव्य ज्योत यात्रेस प्रारंभ होत आहे. यात्रेस चिंचोली येथून दुपारी ४ वाजता प्रारंभ होणार आहे. २६ रोजी एरंडोल तालुक्यातील म्हसावद येथे दिव्य ज्योत यात्रेचा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे खा. राजु शेट्टी यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात येणार असून त्यानंतर राज्यस्तरीय शेतकरी परिषद होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी सुकाणू समितीच्या प्रतिभा शिंदे, शेतकरी संघटनेचे संजय घुगे, सचिन धांडे, संभाजी सोनवणे, तुषार चौधरी, पियुष पाटील, मुन्ना राजपूत आदी उपस्थित होते.
३० गावांतून निघणार यात्रा
जिल्ह्यातील ३० गावांमध्ये दिव्य ज्योत यात्रेच्या माध्यमातून राज्यव्यापी परिषदेसाठी शेतकर्यांना संघटीत करण्यात येणार आहे. धानवड, उमाळा, देव्हारी, करमाड, पळासखेडा, विटनेर, वसंतवाडी, जाळके, वराड, सुभाषवाडी, लोणवाडी, जवखेडा, सामनेर, पाथरी, वडली, डोमगाव, बिलवाडी, वावडदा, रामदेववाडी, शिरसोली, कुर्हाळदा, लमांजन, वाकळी, दापोरा, धानोरा, नागदुल्ली, खर्ची, रवंजे, बोरनार आदी गावात ‘शेतकरी दिव्य ज्योत यात्रा’ निघणार आहे. यात्रेच्या समारोपास शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोपळे, माजी वस्त्रोद्योग महामंडळ अध्यक्ष रविकांत तुपकर, शिवाजी पाटील, घनशाम चौधरी आदींची उपस्थिती लाभणार आहे.