आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात

0

मुंबई – राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. रविवार, ईद आणि गुरुनानक जयंतीच्या सुट्टया वगळता फक्त आठ दिवस अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. हिवाळी अधिवेशनात दुष्काळ, कर्जमाफी, मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि विविध मंत्र्यांवर झालेले आरोप या मुद्यांवरून सरकारला धारेवर धरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे.

विधानसभेत प्रलंबित असलेली आठ व विधान परिषदेची दोन प्रलंबित विधेयके मांडण्यात येणार आहेत. अधिवेशनात दुष्काळावरची महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. दुष्काळासह राज्यातील अनेक समस्यांनी उग्र रूप धारण केले असून, त्यावर विस्तृत चर्चेसाठी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी किमान तीन आठवड्यांचा असायला हवा होता. मात्र ही चर्चा टाळण्यासाठी सरकारने जाणीवपूर्वक अधिवेशन केवळ दोन आठवड्यांचे केल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.