आजही माणुसकी जिवंत असल्याची अनुभूती!

0

रावेत : कुठेही अपघात झाला, तर त्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला मदत करण्याऐवजी त्याचे फोटो काढणे अथवा त्या घटनेचे चित्रीकरण करण्याची मानसिकता अनेकदा दिसून आली आहे. परंतु, रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका जखमी नागरिकाला कोणताही विचार न करता केवळ माणुसकीच्या नात्याने मदत करणारे चिंचवडचे परमेश्वर पुजारी आज मोबाईलच्या आहारी गेलेल्या पिढीसाठी आदर्शवत ठरतात. त्यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे एका जखमीवर वेळेत उपचार होऊन त्यांचे प्राण वाचले. या कामानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.

परमेश्‍वराच्या रुपात आले पुजारी!
आकुर्डीतील रहिवासी अशोक वाळके यांना माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय आला. दोन दिवसांपूर्वी चिंचवड येथील मित्राला ते भेटायला जात होते. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे त्यांना खड्ड्यांचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्यांची दुचाकी घसरून वाळके यांचा दळवीनगर-बिजलीनगर या रस्त्यावर अपघात झाला. त्यात डोक्याला जबर मार लागल्यामुळे ते जागीच बेशुद्ध झाले होते. त्यावेळी बघ्यांची गर्दी जमली होती. त्याच गर्दीतूनच परमेश्वर पुजारी नावाच्या तरुणाने त्यांना तशा परिस्थितीत उचलून नेऊन चिंचवड येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. तीन तासांनंतर त्यांना शुद्ध आली. वेळेवर उपचार झाल्याने त्यांचे प्राण वाचले. परमेश्‍वराच्या रुपाने पुजारी त्यांच्यासाठी धावून आले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

मी ज्या वेळी दुचाकीवरून खाली पडलो; त्या नंतरचे मला काहीच आठवत नाही. मी बेशुद्ध झालो होतो. शुद्ध आली त्यावेळी घरचे समोर होते आणि घरच्यांनी घडलेली हकीकत मला सांगितली. पुजारी यांनी योग्य वेळी केलेली मदत खूपच मोलाची होती. त्यांचा मी आयुष्यभर ऋणी आहे. समाजातील प्रत्येकाने पुजारी यांचा आदर्श घ्यावा व अपघातात प्रत्येकाला मदत करावी.
अशोक वाळके, अपघातग्रस्त नागरिक