आजही 50 टक्के लोकांना बँकींगची सवय नाही : विद्याधर अनास्कर

0

बँकिंग-सामान्यांच्या दृष्टीकोनातून या विषयावर

पिंपरी : पूर्वीच्या काळी बँकांचा प्रसार नसताना लोक गाडग्यामध्ये, मडक्यामध्ये पैसे ठेवत. आजही गृहिणी पैसे साठवतात आणि अडीअडचणीला ते उपलब्ध करुन देतात. आजही 50 टक्के लोकांना बँकींगची सवय नसून पैसे घरात साठविले जातात. मात्र, अर्थव्यवस्थेत या कृतीला शून्य मार्क्स असून घरात पैसा साठवणे अयोग्य आहे, असे मत अर्थतज्ञ विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले. चिंचवड गावातील गांधीपेठ तालीम मित्र मंडळाच्यावतीने आयोजित जिजाऊ व्याख्यानमालेत ‘बँकिंग-सामान्यांच्या दृष्टीकोनातून’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी नगरसेवक अमित गावडे, अभय पोकर्णा, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजा गोलांडे, सचिव गजानन चिंचवडे, समनव्यक सुहास पोफळे आदी उपस्थित होते.

बँकिंग एक कला
अनास्कर पुढे म्हणाले की, घरात पैसा साठविण्यापेक्षा तो अनुत्पादक पैसा उत्पादकतेकडे वळला, तर हळूहळू समाज व राष्ट्र प्रगतिपथावर जाईल. जन धन योजनेसारख्या माध्यमातून सरकारला हेच सांगायचे आहे. बँकेत पैसे ठेवणे म्हणजे बँकींग नव्हे, तर आपले छोटे आर्थिक व्यवहारही बँकींगच्या माध्यमातून चेकद्वारे होणे अपेक्षित आहे. बँकिंग एक कला आहे. ग्राहकाचे अज्ञानही बँकेच्या बॅलन्स शीटमधील सर्वात मोठी सेट असते. कोणत्याही बँकेत ठेव ठेवताना ठेवीचा व्याजदर न विचारता बँकेच्या कर्जाचा व्याजदर विचारावा. कर्जाचा व्याजदर जास्त असेल, तर ठेव ठेवू नये. अधिक दराने कर्ज घेणारास त्याची परतफेड परवडत नाही. बँक अडचणीत सापडते.

शून्य टक्के व्याजदराचे आमिष
कर्ज घेताना व्याजदर फ्लोटिंग की फिक्स हे बँका सांगत नाहीत. आता तर शून्य टक्के व्याजदराचे आमिष कार, दुचाकी विक्री करणारे शोरुम दाखवत आहेत. मात्र शून्य टक्के व्याजदर हा प्रकार असूच शकत नाही हे ग्राहकांनी लक्षात घ्यायला हवे. बँका पोलिस, पुढारी, पत्रकार, वकील यांना कर्ज देत नाहीत. निगेटीव्ह प्रोफाईल म्हणून या घटकांकडे पाहतात. त्यामुळे आता कर्ज मिळवून देणारे सल्लागार हा घटक निर्माण झाला आहे. कर्ज देताना बँकेचे लोक व्हिजिटला येतात. तेव्हा घरातील अमुक फोटो काढा तमुक लावा, असा सल्ला दिला जातो. यावेळी अनास्कर यांनी उपस्थितांच्या प्रश्‍नांना उत्तरेही दिले. बहिरजी चिंचवडे यांनी सूत्रसंचालन केले. तर महेश गावडे यांनी आभार मानले.