नवी मुंबई : नवी मुंबई शहराची निर्मिती ही खाडीकिनारी व खाडीअंर्तगत भागात भराव टाकून झालेली आहे. त्यामुळे पावसाळ्यात दरवर्षी नवी मुंबईत दरवर्षी ताप, हिवताप, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, स्वाईन फ्ल्यू आदी साथीचे आजार मोठ्या प्रमाणात बळावतात. यापार्श्वभूमीवर साथीच्या आजारांविषयी प्रभाग 82, 84 मध्ये घरटी तसेच वाणिज्यिक कार्यक्षेत्रात जनजागृती मोहीम राबविण्याची मागणी काँग्रेसचे स्वंय व रोजगारचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आणि इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
घरटी मार्गदर्शन करण्याची गरज
महापालिका प्रशासनाने रहीवाशांकरिता साथीच्या आजारांविषयी लवकरात लवकर मार्गदर्शन मोहीम सुरू करावी. घरामध्ये काय असावे, काय नसावे, अडगळीच्या वस्तू कशा हानीकारक आहे, पाणी साचू नये, आजार अंगावर काढू नये, सोसायटी आवारात पाणी साचेल असे खड्डे असू नये, डासांना पोषक वातावरण निर्मितीस मदत करू नये याबाबत आपण घरटी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे, असे सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
साथीच्या आजारांची लागण
रहीवाशांना अल्प प्रमाणात का होईना साथीच्या आजारांची लागण झाली आहे. उद्या या आजारांचा उद्रेक होवून हानी होण्यापेक्षा समस्येचे गांभीर्य लक्षात घेता आपण संबंधितांना साथीच्या आजाराविषयी प्रभाग 82,84 मधील नेरूळ सेक्टर 2 व 4 परिसरात आणि जईनगरच्या सेक्टर 24 व 25 परिसरात व्यापक प्रमाणावर मार्गदर्शन मोहीम उघडण्याचे निर्देश देण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.