आजाराला कंटाळून नामवंत डॉक्टरने केली आत्महत्या

0

शिंदखेडा। येथील प्रसिद्ध डॉ.श्याम गिरासे यांनी आजाराला कंटाळून काल सकाळी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांचेवर काल सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत शिंदखेडा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. डॉ. शाम यांच्या निधनामुळे भुमिपूजनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. डॉ.श्याम गिरासे हे 1996 पासून शिंदखेडा शहरातील गांधी चौकात वैद्यकीय सेवा देत होते. आजारातून बरे होणार नाही या भितीपोटी त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपविली.

प्राथमिक स्तरावरील कॅन्सरचे निदान
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या जिभेला व तोंडाला त्रास होत होता व लालसरपणा देखील जाणवत होता. त्यामुळे त्यांना अन्न घेण्यास देखील अवघड होत होते. धुळे येथील डॉ.तुषार पाटील यांच्याकडे तपासणी केली असता प्राथमिक स्तरावरील कॅन्सर असल्याचे निदान झाले. 21 एप्रिल रोजी तपासणी करून आल्यानंतर रात्री 12 वाजेपावेतो डॉ.श्याम गिरासे यांनी आपल्या परिवारासह गप्पागोष्टी केल्या व नंतर घराच्या तिसर्‍या मजल्यावरील खोलीत झोपले गेले. डॉक्टरांची पत्नी स्नेहल ह्या सकाळी (22 एप्रिल रोजी) 6 वाजेच्या सुमारास खाली आल्यानंतर डॉक्टर खाली उतरले नाहीत म्हणून भाऊ हेमंत याने मुलगा अभिजीत यास डॉक्टरांना उठवून आणण्यास सांगितले. त्यावेळी अभिजीतने घाबरून खाली पळत आला व काकांनी गळफास घेतल्याचे सांगितले. सर्वांनी एकच आरडाओरड केला. परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तात्काळ ग्रामीण रूग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉ.गिरासे हे आपल्या आई-वडिल व परिवारासह शनी गल्लीत राहत होते.

चांगली रूग्णसेवा देण्यासाठी ख्याती
कॅन्सरची लागण झाली असून प्राथमिक स्वरुपात असल्याचे झालेल्या निदानाबाबत अधिक तपासणी व उपचार करणेसाठी मुंबई येथील टाटा हॉस्पीटल व कोकीळाबेन हॉस्पीटलच्या तज्ञ डॉक्टरांची वेळ व तारीख घेण्यात आली होती. मात्र डॉ.श्याम यांनी जीवनयात्रा संपविल्याने खबाल उडाली आहे. डॉ.शाम गिरासे यांचे मृत्यूसमयी वय 41 वर्षे होते. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ, पत्नी असा परिवार आहे. त्यांचेवर शिंदखेडा येथील अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ.शाम गिरासे हे शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व. येथील गांधी चौकात 1996 पासून ते वैद्यकीय व्यवसाय करीत होते. मुंबई आरोग्य विद्यापीठाची डीएचएमएस ही पदवी त्यांनी मिळविली होती. चांगली रूग्णसेवा देण्यासाठी त्यांची ख्याती होती.दुसर्‍यांना सहजपणे हसविण्याची कला त्यांच्यामध्ये होती.

शहरातील शासकीय कार्यक्रम रद्द
शिंदखेडा शहरासाठी मंजूर झालेल्या कायम पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते दि. 22 रोजी सायं. 5 वा. होणार होते परंतु डॉ.शाम गिरासे यांच्या निधनामुळे नगरपंचायतीतर्फे आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले, अशी माहिती उपनगराध्यक्ष दिपक देसले यांनी दिली.