आजाराला कंटाळून पाडळसा शिवारात एकाची आत्महत्या

यावल : म्हैसवाडी येथील 48 वर्षीय इसमाने कर्करोगाच्या आजाराला कंटाळून शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. संतोष राजाराम कोळी असे मयताचे नाव आहे.

कर्जरोगाच्या आजाराने होते त्रस्त
म्हैसवाडी येथील संतोष राजाराम कोळी हे कर्करोगाने त्रस्त होते. गेल्या कित्येक महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी पहाटे पूर्वी तीन वाजेला ते घरातून बाहेर पडले. कुटुंबाने त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता पाडळसा, ता.यावल शिवारातील जीवन बोरोले यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत त्यांचा मृतदेह आढळला. याबाबत फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर अखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार हेमंत सांगळे, पोलिस नाईक किरण चाटे, महेश वंजारी हे दाखल झाले व मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. डॉ.शुभम तिडके यांनी शवविच्छेदन केले. या प्रकरणी लिलाधर कोळी यांनी दिलेल्या खबरी वरून फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस नाईक महेश वंजारी करीत आहे. मयत संतोष कोळी यांच्या पश्चात म्हातारे आई-वडील, पत्नी, मुलगा, चार मुली असा परीवार आहे.