तळेगाव : सुरकुतलेल्या चेहेर्यांवर आनंद ओसंडून वाहताना ते चेहरे अधिकच निरागस वाटत होते. निमित्त होते, वानप्रस्थाश्रम या वृद्धाश्रमाच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचे. वृद्धाश्रमातील आजी आजोबांचे एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्सेस पाहून उपस्थित रसिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, नगरसेविका कल्पना भोपळे, शोभा भेगडे, शोभा परदेशी, रजनी ठाकूर, रणजित खांडगे, संस्थाध्यक्ष विठ्ठल भरड, सुरेश साखवळकर, सचिव उर्मिला छाजेड आदींची उपस्थिती होती. आजी आजोबांचे निवेदन, त्यांनी सादर केलेली गाणी, बासरीवादन, विडंबन गीते, नृत्यसादरीकरण, कथाकथन याला रसिकांची वाहवा मिळाली. विविध प्रांतातल्या लोकांच्या दिंडीने कार्यक्रमाचा आलेख उंचावला. या दिंडीत पंजाबी, कानडी, बंगाली, गुजराथी, गोवानीज वेष घातलेले आजी आजोबा कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. या दिंडीत मान्यवरांसह प्रेक्षकदेखील सहभागी झाले होते.