आजी-माजी आमदारांना आपण पाहिले का ?

0

अज्ञातांनी लावले बदनामीकारक फलक: फलक लावणार्‍यांविरोधात पोलिसात तक्रार

रावेर: ‘आजी-माजी आमदार यांना आपण पाहिलत का ?’ या आशयाचे फलक रावेरसह-यावल तालुक्यात मंगळवारी पहाटे झळकताच राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली. हे फलक कुणी व अचानक का लावले? या चर्चेचा दिवसभर खल सुरू असतानाच आमदार हरीभाऊ जावळे यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे धाव घेत अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. इच्छूकांच्या भाऊगर्दीने आधीच हा मतदारसंघ चर्चेत असताना अचानक दोघा इच्छूक आजी-माजी आमदारांविषयी फलक लागल्याने नानाविध चर्चेला ऊत आला आहे. आमदार हरीभाऊ जावळे यांनी या प्रकारानंतर राजकारणातल्या शिखंडीचा हा प्रताप असून नागरीकांच्या आडून ते वार करीत आहेत मात्र त्यांनी समोर येवून जाब विचारण्याची हिंमत ठेवावी, असे खुले आव्हानच फलक लावणार्‍यांना दिले आहे.

राजकारणातल्या ‘शिखंडीने समोर’ येवून विचारावा जाब
राजकारणातल्या शिखंडीची पायाखालची वाळू सरकल्यानेच त्यांनी बदनामी करणारे बॅनर्स लावले आहेत, त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी समोर येवून जाब विचारावा, अशी भावना केळी संशोधन परीषदेचे उपाध्यक्ष व आमदार हरीभाऊ जावळे यांनी व्यक्त केली. रावेर-यावल मतदारसंघात आमदार हरीभाऊ जावळे व माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या संदर्भात लावलेल्या बॅनर्सनंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. यावल-रावेर मतदारसंघाच्या सौजन्याने हे बॅनर्स लावण्यात आले असलेतरी खोडसाळपणा करणार्‍यांनी बॅनर्स लावण्यापूर्वी प्रशासनाची परवानगी घेतली आहे? असा प्रश्‍न आमदार जावळे यांनी उपस्थित करीत या संदर्भात कार्यकर्त्यांना गुन्हे दाखल करण्याचे सांगितल्याचे ते म्हणाले.

आमदार जावळे म्हणाले की, राजकारणातल्या शिखंडीचा हा प्रताप आहे. नागरीकांच्या आडून ते वार करीत आहेत मात्र त्यांनी समोर येवून जाब विचारण्याची हिंमत ठेवावी. रावेरसह यावल तालुका शांतता व सलोखा जपणारा तालुका आहे. पराकोटीचे राजकारण आजपर्यंत येथे झालेले नाही. दुष्काळात आम्ही शेतकर्‍यांसोबत होतो वा नाही तसेच लग्नात हजेरी लावली वा नाही ? हे जनतेला ठावूक असल्याचेही आमदार जावळे म्हणाले.