शहापुर । शहापूर ताक्यातील आजोबा पर्वतावर महर्षी वाल्मीक ऋषींची समाधी आहे. हे ठिकाण तीर्थस्थळ व पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असून या ठिकाणी लाखो पर्यटक व भाविक श्रध्देने येत असतात. याठिकाणी होणार्या विकास कामांसाठी निधी येऊनही रस्ता होण्यासाठी वन खात्याची मंजुरी मिळत नसल्याने मोठी अडचण होत आहे. रस्त्यासाठी वन विभागाने मंजुरी द्यावी याकरिता माजी जिल्हा परिषद सदस्य आणि भाजपा नेते अशोक इरनक यांनी वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांना रस्त्यासाठी लेखी निवेदन दिले आहे.
आजोबा पर्वतावर निसर्गप्रेमीआणि गिर्यारोहक मोठ्या प्रमाणात येतात. महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा असते. त्यामुळे भाविक आणि परिसरातील नागरीक या ठिकाणी येतात. त्यांना जाण्यासाठी रस्त्याची सर्वात मोठी अडचण आहे. कोकण पर्यटन विकास योजने अंर्तगत 90 लाख निधी विकासकामासाठी मंजूर झाला आहे. पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारील रस्त्यांनतर पुढे समाधी स्थळापर्यंत अडीच किलोमीटर लांबीची वन जमीन असल्यामुळे या ठिकाणी रस्ता करण्यास अडथळा आला आहे. याशिवाय त्याचा परिणाम इथल्या विकासकामांवर झाला आहे. त्यामुळे अडथळा निर्माण होत आहे. या बाबीची दखल घेत शहापूर तालुक्यातील भाजपा नेते आणि माजी जिल्हापरिषद सदस्य अशोक इरनक यांनी वनमंत्र्याची भेट घेऊन वन विभागाकडून होणारी अडचण दूर करण्याची मागणी केली आहे.