भाजपातील बंडखोरांसमोर पेच : स्थायी समिती सभापतिपदासाठी पक्ष व्हिप बजाविणार
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत जोरदार घोडेबाजार उफळला असून, एका मताला दोन कोटींचा भाव आला असल्याची माहिती एका सदस्यानेच नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी केलेली गोपनीय मतदान घेण्याची मागणी फेटाळली जाण्याची शक्यता अधिक असून, परंपरेप्रमाणेच हात वर करून मतदान घेतले जाईल. तसेच, या निवडणुकीत बंडखोरी होऊ नये म्हणून सत्ताधारी भाजपतर्फे व्हिप बजाविला गेला असून, पक्षादेशाचे उल्लंघन करणार्या सदस्यांचे नगरसेवकपद जाणार आहे. त्यामुळे दोन कोटी घ्यावे, की घरी बसावे, असा पेचप्रसंग बंडखोरांसमोर पडलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या निवडणुकीत लक्ष घातले असून, पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर जबाबदारी सोपावलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे मोरेश्वर भोंडवे यांचे स्वप्न भंग पावणार असल्याची माहितीही भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दिली. बुधवारी सभापतिपदासाठी मतदान होणार असून, महापालिका वर्तुळात दिवसभर राजकीय हालचाली जोरात सुरु होत्या.
भाजपने बजाविला पक्षादेश
भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक राहुल जाधव यांना स्थायी समितीचे सभापतिपद नाकारून भाजपचे शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांनी लांडगेगटावर कुरघोडी करण्याचा केलेला प्रयत्न भाजपच्या चांगलाच अंगलट आला आहे. त्यामुळे ‘कोल्हापूर पॅटर्न’प्रमाणे स्थायीचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही नामुष्की टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घातले असून, पालकमंत्री गिरीश बापट यांना जबाबदारी सोपावली आहे. त्यांनी आ. जगताप व आ. लांडगे यांच्याशी चर्चा करून मतभेद मिटविण्याचा प्रयत्न केला असून, लांडगे गटाकडे महापौरपदाची दुसरी टर्मही देण्याचे निश्चित झाले आहे. तथापि, मंगळवारी महापालिका वर्तुळात घोडेबाजार तेजित आला होता. स्थायीच्या 16 सदस्यांना तब्बल दोन कोटी रुपयांची ऑफऱ देण्यात आल्याची चर्चा रंगली होती. दुसरीकडे, भाजपच्या अधिकृत उमेदवार ममता गायकवाड यांना दगाफटका होऊ नये, यासाठी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार, स्थायी समितीतील भाजपच्या नगरसेवकांना व्हिप (पक्षादेश) जारी करण्यात आला होता. त्यामुळे गुप्त पद्धतीने मतदान घेण्याची भोंडवे यांची मागणी फेटाळली गेली तर या नगरसेवकांना भाजपच्या गायकवाड यांनाच मतदान करावे लागणार असून, भोंडवे यांचे स्वप्न भंगणार आहे.
राष्ट्रवादीचीच मते फोडण्याची फिल्डिंग!
स्थायीच्या सभापतिपदी राहुल जाधव यांना संधी न मिळाल्याने महापौर नितीन काळजे यांनी महापौरपदाचा पक्षाच्या शहराध्यक्षांकडे राजीनामा दिलेला आहे. तर स्वतः जाधव यांच्यासह शीतल शिंदे यांनी आपल्या स्थायीच्या सदस्यपदाचा पक्षनेत्यांकडे राजीनामे दिलेले आहेत. हे राजीनामे पक्षपातळीवर प्रलंबित असले तरी, ते फेटाळण्याच्या सूचना प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री गिरीश बापट यांनी शहराध्यक्ष आ. जगताप यांना दिलेले आहेत. तथापि, निवडणुकीनंतर याबाबत निर्णय घेण्याचे धोरण निश्चित झालेले आहे. या संदर्भात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. महेश लांडगे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून त्यांची समजूतही काढली होती. भाजपमधील बंडखोरांची मते मिळतात काय? याची चाचपणी राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे करत असले तरी, राष्ट्रवादीचीच मते फोडण्यासाठी आ. जगताप यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे भाजपचे अपक्षांसह 11 मते तसेच राष्ट्रवादीची तीन मते असे 14 मते घेऊन ममता गायकवाड या विजयी होऊ शकतात, अशी शक्यताही वरिष्ठस्तरीय सूत्राने व्यक्त केली आहे.