नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सरकार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष असल्याने भाजपला ३ राज्यात पराभव पत्करावा लागला. त्याचीच दखल घेऊन सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मोदी सरकार तब्बल ४ लाख कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा करण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, त्याचा २ लाख ६३ हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
तीन राज्यांत शेतकऱ्यांमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात असलेल्या नाराजीमुळेच भाजपाला सत्ता गमवावी लागल्याची चर्चा आहे. आता त्याचीच दखल घेत भाजपा ही कर्जमाफी करण्याची शक्यता आहे. एनडीए सरकारसमोर आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे मोठे आव्हान आहे. अशातच जनमानसात भाजपाबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याबरोबरच शेतकरी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी ही कर्जमाफीची घोषणा करण्यात येऊ शकते.