‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ पुस्तक भाजपचे नाही; भाजप प्रवक्ते गिरीश व्यासांचे स्पष्टीकरण !

0

मुंबई: दिल्ली भाजपाच्या कार्यालयात भाजपचे पदाधिकारी जयभगवान गोयल यांनी ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ हे पुस्तक लिहून त्याचे प्रकाशन केले. हा प्रकार आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या प्रकरणी भाजपाने माफी मागावी आणि पुस्तक तातडीने रद्द करावे अशी मागणी होऊ लागली आहे. दरम्यान भाजपचे प्रवक्ते आमदार गिरीश व्यास यांनी हे पुस्तक भाजपचे नाही फक्त भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचे प्रकाश केले आहे असे सांगत या पुस्तकाशी भाजपचा काहीही संबंध नाही असे स्पष्टीकरण दिले आहे. या पुस्तकाविरोधात पोलिसात गेले तरी भाजपला काही फरक पडणार नाही असेही आमदार गिरीश व्यास यांनी म्हटले आहे.

कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून या प्रकारावरून भाजपवर टीका होत आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी यावर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची काय भूमिका आहे? हे स्पष्ट करावे असा सवाल उपस्थित केला आहे. त्यावर माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवरायांची तुलना कोणाशीही होणार नाही. हा प्रकार काही कार्यकर्त्यांचा आहे आणि तो भाजपला मान्य नाही. विरोधकांकडून याचे घाणेरडे राजकारण सुरु आहे. छत्रपतींची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही पण शरद पवार हे जाणता राजा कसे असा सवालही मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे.