जळगाव। ख्वॉजामियॉ झोपडपट्टीच्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपात हॉकर्सला स्थलांतरीत करण्याचा ठराव महासभेने केला आहे. या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने प्रक्रिया सुरु केली असून 782 हॉकर्सला जागा निश्चित करण्यासाठी लकी ड्रॉ काढण्यात आला आहे. त्यानुसार आता उद्या सोमवार 15 रोजी प्रत्यक्ष जागेवर स्थलांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण अधीक्षक एच.एम. खान यांनी दिली.
हॉकर्सचा पर्यायी जागेवर जाण्यास नकार
बळीरामपेठ, सुभाष चौक, शिवाजी रोडवरील हॉकर्सला स्थलांतरीत करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहे. काही महिन्यापुर्वी हॉकर्सला न्यु बी.जे. मार्केट परिसरातील पर्यायी जागेवर स्थलांतरीत करण्यात आले होते. परंतु पर्यायी जागेवर व्यवसाय न करता मूळ जागेवरच व्यवसाय सुरु आहे. परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने प्रशासनातर्फे अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई देखील सुरु होती. या कारवाईत वाद उद्भवल्याने आणि वारंवार वाद निर्माण होवून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. त्यामुळे ख्वॉजामियॉ झोपडपट्टीच्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरीत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी महासभेत ठराव देखील करण्यात आला. त्याअनुषंगाने ख्वॉजामियॉ झोपडपट्टीच्या जागेवर जेसीबीच्या साह्याने सपाटीकरण करण्यात आले. तेथे दुकानांसाठी आखणी करण्यात आली आहे.
782 हॉकर्सला देणार जागा
ख्वॉजामियॉ झोपडपट्टीच्या जागेवर बळीरामपेठेतील 383, सुभाष चौक 309 आणि शिवाजीरोड 90 असे एकूण 782 हॉकर्सला स्थलांतरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी दि.12 रोजी सोडत काढण्यात आली. या सोडतीकडे हॉकर्सने पाठ फिरवली होती. तरीही प्रशासनाने सोडत काढून जागांची निश्चिती केली. उद्या सोमवारी दि.15 रोजी प्रत्यक्ष जागेवर स्थलांतरीत करण्यात येणार आहे. यामध्ये 444 भाजीपाला विक्रेते, 102 फळ विक्रेते, 40 फुल विक्रेते व 196 अन्य किरकोळ विक्रेते असणार आहेत.
हॉकर्सच्या भूमिकेकडे लक्ष
आज सोमवारी सुमारे 800 हॉकर्सचे स्थलांतर करण्याची प्रशासनाची तयारी असली तरी उद्या स्थलांतराच्यावेळी हॉकर्स काय भूमिकेकडे लक्ष लागले आहे. प्रशासनाने मात्र हॉकर्सने स्थलांतरासाठी सहकार्य केले नाही तर त्यांना मूळ जागेवर बसू न देण्याची भूमिका मनपा प्रासनाने केली आहे.