आज दहावी फेरपरिक्षेचा निकाल

0

पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी फेर परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी (दि.29) दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना फेर परीक्षेचा निकाल www.mahresult.nic.inया संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे 18 जुलै ते 2 ऑगस्ट 2017 दरम्यान फेर परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी नऊ विभागीय मंडळातून अनेक विद्यार्थी बसले होते. या फेर परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप संबंधित माध्यमिक शाळेमार्फत देण्यात येणार आहे. तसेच गुणांची पडताळणी करायची असल्यास विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर विहीत नमून्यात व शुल्कासह बुधावार (30 ऑगस्ट) ते 18 सप्टेंबरच्या दरम्यान विभागीय मंडळाकडे अर्ज करावयाचा आहे. विद्यार्थ्यांना अर्जासोबत ऑनलाईन निकालाची प्रत वा गुणपत्रिकेची छायाप्रत जोडणे अनिवार्य राहणार आहे. तसेच गुणपत्रिकेची छायाप्रत प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना 30 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर दरम्यान विभागीय मंडळाला अर्ज करावा लागणार आहे. तसेच पुनर्मूल्यांकनचा अर्ज विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळाल्यानंतर दुसर्‍या दिवासापासून पुढील पाच दिवसांत करता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रकाद्वारे कळवली आहे.