आज दहीहंडीचा थरार; पंतप्रधानांकडून शुभेच्छा !

0

पुणे-‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषात थरावर थर रचणारी पथके, डिजेच्या तालावर ठेका धरणारी तरुणाई अशा उत्साहवर्धक वातावरणात राज्यभरात दहीहंडीचा उत्सव पाहायला मिळत आहे. मात्र, उच्च न्यायालयाने घातलेले निर्बंध आणि पोलिसांची कारवाई, अशा परिस्थितीमुळे आज, सोमवारी साजऱ्या होणा-या दहीहंडी उत्सवात कदाचीत दरवर्षीपेक्षा थरांची स्पर्धा कमी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

दहीहंडी समन्वय समितीने सर्व गोविंदा पथकांना सूचना करणारे निवेदन दिले आहे. दहीहंडी समन्वय समितीने सुरक्षा, वैद्यकीय मदत, बालगोविंदाचा सहभाग याविषयी महत्त्वाच्या सूचना निवेदनात समाविष्ट केल्या आहेत. १४ वर्षांखालील गोविंदा थरात नसावा याची वारंवार सूचना द्यावी, तसे आढळल्यास त्या मंडळास थर लावू देऊ नये, अशी सूचना करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी बालगोविंदांना सहभागी करणाऱ्या मंडळांवर कारवाई होत होती. यंदा मात्र पालकांवरही कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. फक्त मुंबईतच नाही, तर ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यासह मुख्य शहरांमध्ये पोलिसांनी असा इशारा दिल्याचे सांगितले जात आहे.