आज पहिला टी-20 सामना, संधी रैनाला मिळणार?

0

जोहान्सबर्ग । एकदिवसीय क्रिकेट मालिकेत दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धुळ चारल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्‍वास वाढला आहे. एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर आता भारतीय संघ आता टी-20 क्रिकेट मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. आपल्या विजयाची घोडदौड सुरू ठेवण्यासाठी भारतीय संघाला टी-20 मालिका जिंकायची आहे. रविवारपासून सुरू होणार्‍या टी-20 मालिकेमध्ये सुरेश रैनाला संघामध्ये संधी देण्यात आली आहे. वर्षभरानंतर संधी देण्यात आल्याने सुरेश रैनावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या स्पिनर्सची जोडी आफ्रिकन संघाची परीक्षा घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. आफ्रिकन मैदानात भारतीय संघ आणि टी-20 सामन्यांसंदर्भात काही खास आठवणी जोडल्या आहेत. भारतीय संघाने पहिला टी-20 सामना 2006 साली दक्षिण आफ्रिकेतच खेळला होता आणि वर्षभरानंतर भारताने आफ्रिकेतच पहिला टी-20 विश्‍वचषक जिंकला होता.

रैनाला अंतिम 11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता
रविवारपासून सुरू होणार्‍या टी-20 क्रिकेट मालिकेसाठी सुरेश रैना, केएल राहुल आणि जयदेव उनादकट यांना संधी देण्यात आली आहे. सुरेश रैनाला अंतिम 11मध्ये संधी देण्यात येण्याची दाट शक्यता आहे. रैनाने 2015 नंतर एकदिवसीय सामना खेळलेला नाही आणि वर्षभरापूर्वी इंग्लंड विरुद्ध शेवटची टी-20 क्रिकेट मालिका खेळली होती.

सुरेश रैनाने आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये एक अर्धशतक झळकवले होते आणि एकूण 104 धावा केल्या आहेत. जयदेव उनादकट याच्यावरही सर्वांच्या नजरा असणार आहेत. ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेपासून आतापर्यंत भारताने सहा टी-20 सामन्यांपैकी चार सामन्यांमध्ये उनादकटला संधी दिली होती. जयदेव उनादकट आयपीएलच्या 11 व्या सत्रामध्ये सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याला 11.5 कोटी रुपयांत खरेदी करण्यात आले. सामना संध्याकाळी सहा वाजता सुरू होणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी टेन1 आणि सोनी टेन3 वर होणार आहे. इंटरनेटवरही सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग सोनी लिववर पाहायला मिळेल.