इस्लामाबाद : पाकिस्तानात आज सार्वत्रिक निवडणुका होत असून, त्या देशाच्या ७० वर्षांच्या इतिहासात दुसऱ्यांदा नागरी सरकारकडून दुसऱ्या सरकारकडे सत्तेचे हस्तांतरण होणार आहे. या निवडणुकीत इस्लामी कट्टरतावाद्यांच्या सहभाग आणि लष्कराचा निवडणुकांत हस्तक्षेप असल्याचा आरोप होत आहे.
नॅशनल असेंब्लीच्या २७२ जागांसाठी ३४५९ उमेदवार रिंगणात असून, चार प्रांतिक असेंब्लीच्या ५७७ जागांसाठी ८३९६ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण १०५.९५ दशलक्ष मतदार नोंदणीकृत आहेत. लष्कराने माजी क्रिकेट कर्णधार इमरान खान याला पाठिंबा दिला आहे. लष्कराने पाकिस्तानात १९४७ पासून अनेकदा बंड करून सत्ता हातात घेतली आहे. नागरी सरकारांच्या काळातही लष्कराच्याच हातात अप्रत्यक्षपणे सत्ता होती. परदेशी व सुरक्षा धोरणे लष्करच ठरवत होते. लष्कराला दंडाधिकारीय अधिकार देण्यात आल्याने टीका होत असून, निवडणूक केंद्रांच्या आत व बाहेर लष्कर तैनात करण्यात आले आहे. लष्कर प्रमुख कमर बाजवा यांनी मात्र लष्कराचे अधिकारी निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचे पालन करतील असे आश्वासन दिले आहे.