आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील घेणार आढावा बैठक

0

जळगाव। पालकमंत्री चंद्रकांत पाटील शुक्रवार 21 एप्रिल रोजी शहरात येत आहेत. पालकमंत्र्यांनी शहरातील प्रश्‍न विषयी महानगर पालिका अधिकार्‍यांची बैठक दुपारी 3 वाजता ठेवली आहे. या बैठकीत हुडको कर्ज, दुकान गाळे स्टे, फुले मार्केट मालकी, अधिकार्‍यांची कमतरता या मुद्यांवर चर्चा करण्यात येणार असल्याचे आयुक्त जीवन सोनवणे यांनी सांगितले. महानगर पालिकेत पुरेसे अधिकारी नसल्याने प्रशासकीय कार्य करण्यात अडचणी जाणवत असल्याने अधिकार्‍यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव पालकमंत्र्यांकडे ठेवण्यात येणार आहे. महानगर पालिकेत 15 अधिकार्‍यांना मंजूरी असतांना केवळ 2 अधिकार्‍यांवर प्रशासनाचे कार्य चालत आहे. अधिकार्‍यांच्या रिक्त पदांमध्ये 1 अप्पर आयुक्त, 2 उपायुक्त, 3 सहाय्यक आयुक्त, 1 नगररचना सहाय्यक संचालक, 1 नगररचनाकार, 1 आरोग्य अधिकारी, 1 मलेरिया अधिकारी, 1 मुख्य लेखा परीक्षक, 1 मुख्य लेखा अधिकारी यांचा समावेश आहे.

हुडको, दुकान गाळे, फुले मार्केट मालकीबाबत करण्यात येणार चर्चा
शहरातील विकास कामांसाठी राज्य शासनाकडून मिळालेल्या 25 कोटींच्या निधीतून लेंडी नाल्याला संरक्षण भिंत बांधणे व एलईडी खरेदीसाठी 11 कोटी रूपयांचा प्रस्ताव आढावा बैठकीत सादर करण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता थोरात यांनी दिली़ राज्य शासनाकडून शहरात विविध विकास कामांसाठी 25 कोटी रूपयांचा निधी मिळल्याने या निधीतून रस्त्यांची कामे होणार होती़ मात्र, अमृत योजनेत शहरातील पाणीपुरवठ्याची पूर्ण पाईपलाईन बदलविण्यात येणार असल्याने रस्त्ये खोदले जाणार आहेत. त्यामुळे रस्त्यांचे कोणतेही काम या निधीतून करण्यात येणार नसल्याचे ठरले आहे.

एलईडी खरेदीसाठी 11 कोटींचा प्रस्ताव
25 कोटींच्या निधीतून लेंडी नाल्याला संरक्षण भिंत बांधणे व एलईडी खरेदीसाठी 11 कोटी रूपयांचा प्रस्ताव आढावा बैठकीत सादर करणार असल्याची माहिती थोरात यांनी दिली़ या बैठकीला महापौर नितीन लढ्ढा यांच्यासह मनपाच्या अधिकार्‍यांना बोलाविण्यात आले आहे. लेंडी नाल्याची लांबी साडेसात क़िमी़ असून त्यापैकी पॉईंट 3 क़िमी़ संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे़ तेव्हा उर्वरित संरक्षण भिंत बांधण्यासाठी हा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे़ यासोबतच शहरातील रहिवास वस्तीतून जाणार्‍या नाल्यांवरही संरक्षण भिंत बांधण्याचा प्रस्ताव देणार असल्याचेही ते म्हणाले़