आज पुन्हा एनआयएची छापेमारी; पाच जणांना घेतले ताब्यात

0

नवी दिल्ली-इसिसपासून प्रेरणा घेऊन नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘हरकत उल हर्ब-ए-इस्लाम’ या दहशतवादी गटाचा देशात मोठा घातपात घडवण्याचा कट राष्ट्रीय तपास यंत्रणेने २६ डिसेंबर रोजी उधळून लावला होता. २६ डिसेंबर रोजी १७ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. आता पुन्हा एनआयए आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने छापेमारी केली आहे.

उत्तर प्रदेशातील अमरोहा आणि दिल्लीतील जाफराबाद, सीलमपूर परिसरात छापा मारण्यात आला. नव्याने मारण्यात आलेल्या छापेमारीदरम्यान आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपींकडून शस्त्रसाठा आणि इसिसचे पोस्टर जप्त करण्यात आले आहेत. या पाचही जणांची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

२६ डिसेंबरला ‘हरकत उल हर्ब-ए-इस्लाम’ संघटनेच्या १० हस्तकांना उत्तर प्रदेश आणि दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले होते. अटक करण्यात आलेल्या १० जणांना १२ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

संशयितांना जेथून ताब्यात घेण्यात आले, त्या ठिकाणाहून एक रॉकेट लाँचर, १२ पिस्तुले, अन्य शस्त्रे, १०० नवे कोरे मोबाइल फोन, १३५ सिमकार्ड आणि मेमरी कार्ड आणि दारूगोळ्याचा मोठा साठाही हस्तगत करण्यात आला.