आज फटाके विक्री बंदीबाबत सुप्रीम कोर्ट देणार निर्णय !

0

नवी दिल्ली- प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी देशभरात फटाके विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट आज निर्णय देणार आहे. केंद्र सरकारने कोर्टात बाजू मांडताना या याचिकेला विरोध दर्शवला आहे. दरम्यान आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे. सुप्रीम कोर्टात न्या. ए. के सिकरी हे या याचिकांवर निर्णय देण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत फटाके फोडता येणार की नाही, हे आज स्पष्ट होणार आहे.

गेल्या वर्षी दिल्ली आणि लगतच्या भागात फटाक्यांच्या विक्रीवर सुप्रीम कोर्टाने बंदी घातली होती. ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे कोर्टाने हा निर्णय दिला होता. याच धर्तीवर देशभरात फटाके विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिकाही दाखल झाली. या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्यात आली. सुनावणी दरम्यान केंद्र सरकारने देशभरात फटाकेविक्रीवर बंदी घालण्यास विरोध दर्शवला होता. फटाक्यांवर सरसकट बंदीऐवजी फक्त मोठ्या आवाजाच्या फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालता येतील, अशी भूमिका केंद्र सरकारने मांडली होती.

तर फटाके विक्रेता आणि उत्पादक संघटनांच्यावतीनेही कोर्टात बाजू मांडण्यात आली होती. बंदीमुळे लाखो लोकांचा रोजगार हिरावला जाईल. तसेच प्रदूषणासाठी फक्त फटाकेच कारणीभूत ठरत नाही, असा युक्तिवाद संघटनाच्यावतीने करण्यात आला होता.

याचिकाकर्त्यांनी फटाके विक्रीवरील बंदीचे समर्थन करताना दिल्लीतील प्रदूषणाचा दाखला दिला होता. प्रदूषणाचा थेट परिणाम देशाच्या युवा पिढीवरही होत आहे. त्यामुळे फटाके विक्रीवर बंदी घालणेच योग्य असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले होते.