आज भाजपची अग्नीपरीक्षा; बहुमतासाठी भाजप हे मार्ग अवलंबणार

0

बंगळूर-कर्नाटक विधानसभेत आज संध्याकाळी ४ वाजता बहुमत चाचणी होणार असून यात येडियुरप्पा बहुमताचा आकडा कसा गाठणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज ४ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले असल्याने भाजपसह येडियुरप्पा यांची खरी अग्नीपरीक्षा आहे.

राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केल्याने मुख्यमंत्री म्हणून येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मात्र त्यांच्याकडे अद्यापही बहुमत नाही. बहुमताचा आकडा ११२ असतांना भाजपकडे १०४ जागा आहे. त्यामुळे भाजप मोठा पक्ष असतांना देखील बहुमतात नाही. तर दुसरीकडे कॉंगेस व जेडीएसने निवडणूकोत्तर आघाडी केल्याने त्यांची संख्याबळ ११५ होते. दरम्यान आज भाजप बहुमतासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करते हे येणारा काळ सांगेल.

अशी परिस्थिती असणार
कर्नाटक विधानसभेचे एकूण संख्याबळ २२४ इतके आहे. दोन जागांची निवडणूक अजून बाकी असल्याने सध्याचे संख्याबळ २२२ इतके आहे. जनता दल सेक्यूलरचे नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार कुमारस्वामी हे दोन जागांवर निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी एक जागा सोडल्यावर सभागृहाचे संख्याबळ २२१ वर येईल. विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांचे मत गेल्याने संख्याबळ २२० वर येते. अशा स्थितीत बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ १११ इतके आहे. भाजपाकडे सध्या १०४ आमदार असून काँग्रेस- जेडीएस युतीकडे ११५ आमदारांचे पाठबळ आहे. बसप आणि अन्य पक्षाचे प्रत्येकी एक आमदार आहेत.

भाजप असे करू शकतो
१. काँग्रेस आणि जनता दल सेक्यूलर या विरोधी पक्षांचे किमान १० आमदार राजीनामा देतील. त्यांना नंतर भाजपकडून विधानसभेत किंवा परिषदेत निवडून आणले जाईल.

२. विरोधी पक्षांचे किमान १० आमदार प्रकृती अस्वास्थ्य व तत्सम कारण देऊन गैरहजर राहतील. त्यामुळे त्यांची संभाव्य कारवाईतून सुटका होईल.

३. विश्वासदर्शक ठरावावरील मतदानाच्या आधी सभागृहात विरोधी पक्षांतील काही आमदार गोंधळ घालतील त्यामुळे त्यांच्यावत असंसदीय वर्तनामुळे सभापती किमान १० आमदारांवर निलंबनाची कारवाई करतील. त्यायोगे आपोआपच विरोधी पक्षांचे संख्याबळ घटेल.

४. गुप्तमतदान होईल. तसे करू नये असे सर्वोच्च न्यायालयाने सुचविले असले, तरी अखेर सभागृहात सभापतींचेच राज्य असते. ते मतदान गुप्तपणे करण्याचा निर्णय देऊ शकतील. आपोआपच विरोधी पक्षांचे संख्याबळ घटेल.

५. एक मत कमी पडल्यावर घोडेबाजार न करता अटलबिहारी वाजपेयी यांनी जसा नैतिकतेला अग्रक्रम देत सत्ता सोडण्याचा निर्णय घेतला, त्याची आठवण झालीच, तर तो कित्ता कर्नाटकात भाजप गिरवेल आणि विरोधकांच्या राजकीय लालसेवर दोन वर्षे टीका करण्याची संधी घेईल. अर्थात ही शक्यता अगदी कमी आहे.