आज भाजी, फळ विक्रेत्यांचे ख्वॉजामियॉ मैदानावर स्थलांतर

0

जळगाव। गोलाणी मार्केट तसेच परिसराची स्वच्छता केल्यानतंर प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी शहरातील सर्व उद्यानांचा स्वच्छतेचा प्रश्‍न हातात घेतला आहे. यानुसार श्री. निंबाळकर यांच्या सूचनेनंतर शहरातील सर्व उद्यानांच्या स्वच्छतेच्या कामांना आजपासून सुरुवात करण्यात आली. आज देखील प्रभारी आयुक्तांनी बळीराम पेठ, शिवाजी नगर भागात जावून स्वच्छतेची पाहणी केली. दरम्यान मध्य बाजारपेठेतील हॉकर्सचे उद्या गुरुवारी सकाळी ख्वाजामियॉ चौकात स्थलांतर होणार आहे.

येथे घेतला आढावा : गेल्या 15 दिवसांपासून आक्रमक कार्यशेलीने समस्त जळगावकरांचे लक्ष वेधून घेणारे जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी आज बुधवारी सकाळीदेखील शहरातील विविध विभागात स्वच्छतेची पाहणी केली. त्यांनी सकाळी बळीरामपेठ व शिवाजीनगर भागात पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत आरोग्यअधिकारी डॉ.विकास पाटील, आरोग्य अधिक्षक, आरोग्यनिरिक्षक उपस्थित होते. त्यांनी शिवाजीनगरात थांबून नागरिकांकडून स्वच्छतेच्या कामांची माहीती करून घेतली. शहरातील नवीन बस्थानकासमोरील भजेगल्लीत त्यांनी स्वच्छतेच्या कामांचा आढावा घेतला.

उद्यानांच्या स्वच्छतेला सुरुवात
प्रभारी आयुक्तांच्या सूचनेवरुन शहरातील उद्यानांची स्वच्छता करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. आज बुधवारी पहिल्याच दिवशी मध्यवर्ती भागातील डॉ.शामाप्रसाद मुखर्जी उद्यांनाच्या सफाईचे काम हाती घेण्यात आले. गोलाणी मार्केटसह सतरा मजली इमारत असलेल्या मध्यवर्ती परिसरातील तसेच महापौर नितिन लढ्ढा यांच्या प्रभाग 8 मध्ये आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी प्रभागातील तुंबलेल्या गटारी स्वच्छ करण्यात आल्यात. उर्वरित उद्यानातील स्वच्छतेला यापुढेही चालना देण्याचे त्यांनी संबंधितांना सांगितले.

हॉकर्सचे आज स्थलांतर
प्रभारी आयुक्त निंबाळकर यांनी आज बुधवारी शहरातील ख्वॉजा मियॉ चौकातील मोकळ्या जागेची देखील पाहणी केली. त्यांनी यावेळी मैदानी स्वच्छता करण्याच्या सूचना केल्यात. तसेच शहरातील बळीरामपेठ, शिवाजी रोड व सुभाष चौकातील भाजी व फळ विक्रेत्यांचे स्थलांतर उद्या गुरुवारी करण्याचे आदेश अतिक्रमण विभागाचे अधिक्षक एच.एम. खान यांना दिलेत. शहरातील स्वच्छतेसोबतच अतिक्रमणाच्या प्रश्‍नावर प्रभारी आयुक्त निंबाळकर यांनी लक्ष घातले आहे. यानुसार अतिक्रमणधारकांना खॉजामियॉ मैदानावर स्थलांतराची प्रक्रिया गुरुवारपासून करण्यात येणार आहे. यात शिवाजीरोड, बळीरामपेठ, व सुभाष चौकातील विक्रेत्यांना स्थलांतर करण्यात येणार आहे.