मुंबई: महाविकासआघाडीच्या सरकारने सत्ता स्थापन केले आहे. नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. मात्र अद्याप खाते वाटप होऊ शकलेले नाही. दरम्यान आज बुधवारी खातेवाटप होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाची दुपारी ३ वाजता बैठक पार पडणार असून या बैठकीत खातेवाटपावर चर्चा होऊ शकते. खातेवाटपात एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. शिवसेना, कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये खातेवाटपाबाबत अध्याप सूत्र ठरलेले नसल्याने खातेवाटपाला विलंब होत आहे. काँग्रेस नेते दिल्लीत गेले असून खातेवाटपासंबंधित चर्चा करण्यासाठी गेल्याचे सांगितले जात आहे.
१६ ते २१ डिसेंबर दरम्यान नागपुरात हिवाळी अधिवेशन पार पडणार असून त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार होणे अशक्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारदेखील हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात इच्छुक नसल्याची माहिती आहे. खातेवाटपासंबंधी अद्यापही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये चर्चा झालेली नाही. त्यामुळे ही चर्चा होऊन त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी वेळ लागू शकतो.
महाविकास आघाडीचा मंत्रिपदाच्या वाटपाचा जो फॉर्म्युला ठरला होता त्यानुसार शिवसेनेला १६ मंत्रिपद, राष्ट्रवादीला १४ आणि काँग्रेसला १२ मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात नेमका कुणाचा समावेश होणार याविषयी चर्चा सुरू झाली आहे.