मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक आज दुपारी १२ ते २ वाजेदरम्यान दोन तास बंद राहणार आहे. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर पनवेलजवळ ओव्हरहेड गँट्रीज बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. एक्स्प्रेस वेवर ठिकठिकाणी कमानी उभारण्यात येत आहेत. यामुळे आज वाहनचालक आणि प्रवाशांची काही काळ गैरसोय होणार आहे.
या कमानी उभारताना संपूर्ण रस्ता बंद ठेवावा लागतो. बंदच्या वेळेत पुण्याला जाणारी वाहतूक कळंबोली बायपासमार्गे वळवण्यात येणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे पनवेलजवळ इलेक्ट्रॉनिक फलक लावण्याचे काम सुरू आहे. या कालावधीत वाहनचालकांनी कळंबोली सर्कल, उरण बायपास रोड, टी-पॉइंट, पळस्पे फाटा, कोन, कोन ब्रीज व तेथून एक्सप्रेस-वे वर यावे असे आवाहन करण्यात आले आहे.