पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज पहिल्यांदाच एकत्रित दौरा होत आहे. आज बुधवारी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्यात होणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणार आहेत. राज्यातील सत्तास्थापनेनंतर दोन्ही नेते पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. मुख्यमंत्री ठाकरे पहिल्यांदाच मांजरी येथील ‘व्हीएसआय’ला येत असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे त्यांच्या घोषणेकडे लक्ष लाले आहे.
शरद पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत. या वेळी ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखान्यांना पुरस्कार दिले जाणार आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे या कार्यक्रमात भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.
साखरेचा प्रति क्विंटलचा निर्धारित दर तीन हजार १०० रुपये आहे. तो किमान तीन हजार ३०० रुपये करण्याची ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. साखरेसाठी द्विस्तरीय किंमत धोरण राबवण्याची या शेतकऱ्यांची मागणी असून, ग्राहक आणि व्यापारी वापरासाठी साखरेचे दोन दर असावेत, असा या शेतकऱ्यांचा आग्रह आहे. या मागण्या केंद्र सरकारशी संबंधित असल्या, तरी राज्य सरकार याबाबत काय करणार, यावर मुख्यमंत्री ठाकरे भाष्य करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.