आज शहरात रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंचा नागरी सत्कार

0

धुळे। गेल्या शंभर वर्षांपासून मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाचे स्वप्न पाहणार्‍या धुळे जिल्हावासियांच्या स्वप्नपूर्तीसाठी साक्षात ना. प्रभूंना पुढाकार घ्यावा लागला. धुळ्याशी कौटुंबिक नाते असलेल्या राजकारणातील जन्टल मॅन असणार्‍या रेल्वे मंत्री ना. सुरेश प्रभू यांची आमच्यावर कृपा झाली आहे. अशी भावना धुळेकरांची आहे. त्यांच्यामुळे मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाला गती मिळाली आहे. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावण सरींसोबत आज धुळेकर नागरीकांच्यावतीने ना.सुरेश प्रभू यांचा जाहीर सत्कार होणार आहे. दुपारी 3.30 वाजता राजर्षी शाहू महाराज नाट्य मंदिरात ना.प्रभू यांचा नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी केली जात असल्याचे चित्र आज दिसून आले. या तयारीसाठी फक्त भाजपाचेच कार्यकर्ते नव्हे तर जिल्हाभरातील अनेक नागरीकही सहभागी असल्याचे दिसले. खंडेराव बाजार रेल्वे संघर्ष समितीने सर्वप्रथम मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासाठी प्रयत्न सुरु केले. त्यानंतर धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग कसा फायदेशीर आहे, त्यामुळे धुळ्याच्या विकासात कशी भर पडेल, हे धुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला पटवून दिले.

डॉ.भामरे यांनी केला पाठपुरावा
केंद्रात मंत्री असलेल्या ना. डॉ. भामरे यांनी मनमाड- इंदूर रेल्वेसाठी अनेकवेळा केंद्रीय रेल्वेमंत्री ना. सुरेश प्रभू यांची भेट घेतली. या प्रश्‍नाचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिले. उद्या रेल्वे मार्गासंदर्भात धुळ्यात आढावा बैठक होत असून, त्या बैठकीत मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाच्या सद्यस्थितीबाबतची माहिती ते जाणून घेतील. त्यांच्यामुळे रेल्वेमार्गाला गती मिळत असून हा रेल्वेमार्ग लवकरच साकारला जाईल, अशी अपेक्षा धुळेकर नागरीक व्यक्त करीत आहेत.