उरण । एलईडी लाइटद्वारे पर्ससिन नेटने मासेमारी करण्यास केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने 10 नोव्हेंबर 2017 पासून कायमची बंदी घातलेली असतानाही महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत काही धनाढ्य मच्छीमार छुप्या पद्धतीने एलईडी बल्बद्वारे मासळीला टिबवून पर्सनेट प्रकारची मासेमारी करत आहेत. याविरोधात महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती आणि अखिल भारतीय खलाशी संघटना सातत्याने आवाज उठवत असतानाही ही माशांची पैदाईशच संपवणारी एलईडी बल्बच्या साहाय्याने केली जाणारी मासेमारी बंद होण्याचे नाव घेत नसल्याने अखेर शेवटचा उपाय म्हणून येत्या शुक्रवारी 9 फेब्रूवारी रोजी मुंबईच्या ससून डॉक बंदरावर थेट हल्लाबोल आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने दिला आहे.
95 टक्के मच्छीमारांवर उपासमारी
एलईडी फिशिंगमध्ये प्रखर दिव्यांमुळे खलाशांच्या डोळ्यांना इजा होत असल्याचे प्रत्यक्ष काम करणार्यांचे म्हणणे आहे. शिवाय या बोटींवर काम करणार्या खलाशांचे प्रमाण जेमतेम 5 टक्के असले तरी मासळीचा प्रचंड उपसा आणि होणारी प्रचंड नासाडी यामुळे समुद्रात मासळीची दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे उर्वरित 95 टक्के खलाशी बांधवांवर उपासमारीची वेळ येऊ शकते, असेही काही खलाशांचे म्हणणे आहे. या सर्व पार्श्वभूमीवर येत्या शुक्रवारी मुंबईच्या ससून डॉक बंदरावरच हल्लाबोल आंदोलन केले जाणार असल्याने आता सरकार आणि मत्स्यव्यवसाय खात्याच्या उच्च पदस्थ अधिकार्याची मात्र कसोटी लागणार असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने या आंदोलनात महाराष्ट्रे भरातील सर्व मच्छीमार समाजाने सहभागी होण्याचे आवाहन ही केले असल्याने या आंदोलनाचे काय होते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
समितीच्या वतीने मत्स्यव्यवसाय खात्याला पाठवलेल्या पत्रातून हा इशारा देण्यात आला आहे. आधीच सततच्या प्रदूषणाने खोल समुद्रात ही मासळी मिळेनाशी झाली आहे. त्यातच वाढलेले डिझेल दर, मजुरीची वाढती किंमत यातून आधीच मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर काही बड्या भाडंवलदार मासेमारांनी खोल समुद्रात एलईडी बल्बद्वारे प्रकाश पाडून मासेमारी करण्याचे फॅड आणले आहे. यातून मासळी मोठ्या प्रमाणात मिळत असली, तरीही समुद्रातील छोट्या मासळीची नाहक मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. समुद्रातील मासळीच नामशेष करणारी ही एलईडी मासेमारी असून यावर बंदीची मागणी पारंपरिक मच्छीमार खलाशांनी सुरुवातीपासून लावून धरली आहे.
पारंपरिक व्यवसाय धोक्यात
खोल समुद्रात या आधुनिक पद्धतीने केल्या जाणार्या मासेमारीने पारंपरिक मासेमारी व्यवसाय धोक्यात येण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. यातूनच आंदोलनात्मक पवित्रा घेत मासेमारी नौकांवर काम करणार्या खलाशांनीदेखील यापूर्वीच एलईडी मासेमारी नौकेवर न जाण्याचा निर्णय जाहीर केला असून खलाशी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. याबाबत केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयानेदेखील एक निर्णय घेऊन अशा प्रकारची मासेमारी केली जाऊ नये असे निर्देश दिले आहेत. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे अधिकार राज्याचे मस्त्य खाते आणि भारतीय तटरक्षक दलाला देण्यात आले आहेत. खोल समुद्रात प्रखर एलईडी दिव्यांचा वापर करून रात्रीच्या गर्द अंधारात मोठ्या प्रमाणात मासे पकडले जात आहेत. या पद्धतीने मासेमारी करणार्यांची संख्या फार कमी असली तरीही मोठ्या प्रमाणात मिळणार्या मासळीने प्रचंड आर्थिक नफा होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या एलईडीने मासेमारी करण्याचे प्रमाणही वाढत आहे. या पद्धतीत सरसकट सर्व जातीची व आकाराची मासळी मिळते. मात्र, छोट्या माशांची प्रचंड नासाडी होत असल्याने भविष्यात मासळीचा दुष्काळ पडण्याची भीती या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.