मुंबई – लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय क्षेत्र अगदी ढवळून निघाले आहे. लोकसभेसाठी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने प्रचार देखील सुरु झाला आहे. त्यामुळे सगळीकडे प्रचार सभा, रॅली निघत आहे. दरम्यान आज गुढीपाडव्याचा मुहुर्त साधत राजकीय पक्षांनीही आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या नांदेडमध्ये तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नेहमीप्रमाणे मुंबईच्या शिवाजी पार्क येथे सभा घेत आहे. दोघांच्या सभेकडे आज लक्ष लागून आहे.
मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा वर्ध्यात झाली होती. त्या सभेत मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली होती. तर 19 मार्च रोजी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुख्यत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष्य केले होते. त्यामुळे आज होणाऱ्या सभेत हे दोन्ही नेते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मनसे लोकसभा निवडणूक लढणार नसली तरी भाजपाविरोधात प्रचार करण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. राज ठाकरे यांनी मोदी-अमित शाह यांच्याविरुद्ध दंड थोपटले असल्याने आजच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज नेमके काय बोलणार यावर सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.