आझम पानसरेंचे पुनर्वसन कधी?

0

पिंपरी-चिंचवड (बापू जगदाळे) : शहरात मंत्रीपदाच्या निवडीचे वारे वाहत आहेत. यासाठी आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे; पण महापालिकेच्या सत्ता परिवर्तनास या दोन आमदारांबरोबरच मोलाची कामगिरी बजावणार्‍या माजी महापौर आझम पानसरे यांच्याकडे मात्र भाजपाने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये प्रवेश करुन आता पाऊण वर्ष होत आले, तरी पक्षाकडून त्यांच्या पुनर्वसनाला अद्याप मुहूर्त मिळत मिळालेला नाही. साहजिकच पानसरे गटाच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता पसरली आहे. ही अस्वस्थता त्यांना कोणत्या राजकीय दिशेने घेऊन जाईल हे पक्षाच्या धोरणावरच अवलंबुन असणार आहे; पण पानसरे यांच्याबाबत पक्ष सध्याच्या हालचालीवरुन तरी गंभीर असल्याचे दिसत नाही.

औरंगाबाद येथील मरावाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सोहळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार करण्यात येईल असे सांगितले होते. यामुळे पिंपरी चिचंवड शहरात पुन्हा आशेची लहर उमटली आहे. कारण महापालिकेच्या निवडणुकीवेळेस महापालिकेत सत्ता परिवर्तन केल्यास शहराला मंत्रीपद दिले जाईल असा शब्द येथील जनतेला मुख्यमंत्र्यांनी दिला होता. पण अद्यापही या आश्वासनाची पुर्तता झालेली नाही; पण मंत्रीपद आमदार लांडगे किंवा जगताप यांना मिळेल अशी जोरदार चर्चा सध्या शहरातील राजकीय वर्तुळात रंगत आहे. मात्र, ज्या कामाची बक्षीस म्हणून शहराला मंत्रीपद मिळणार आहे. त्या कामात आझम पानसरे यांचे देखील मोठे योगदान आहे.

पानसरे यांनी राष्ट्रवादीत असताना 1999 साली पूर्वीच्या हवेली विधानसभेची निवडणुक लढवली होती. 2009 साली लोकसभेच्या पुर्नररचनेत नव्याने तयार झालेल्या मावळ लोकसभेची निवडणुक देखील लढवली होती. पण या दोन्ही वेळेस पराभव पत्करावा लागला होता. हा पराभव पक्षांतर्गत कलहातून विशेषत: लक्ष्मण जगताप यांच्यामुळेच झाल्याचा पानसरेंचा आजही आरोप आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही दखल न घेतल्याने राष्ट्रवादीला सोडचिंठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. नंतर आमदार जगताप यांच्या 2014 च्या लोकसभासाठी बारणे यांना मदत केली. नंतर जगताप भाजपावासी झाल्यावर पानसरे यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला. परंतु राष्ट्रवादीत पुर्वीचाच अनुभव येत असल्याने पानसरे नाराजच होते. मात्र, भोसरीचे भाजपवासी आमदार महेश लांडगे यांनी जगताप व पानसरे यांच्यामधील वितुष्ट मैत्रीत बदलुन पानसरे यांचा भाजप प्रवेश करुन घेतला. हा प्रवेश काही अटीवर झाला होता. कुणी म्हणते पानसरे यांना वक्फ बोर्डाचे अध्यक्ष पद दिले जाणार होते, तर काहीचे मत होते के पानसरे यांना विधानपरिषदेवर घेतले जाणार आहे. पण प्रवेश अटीचे कारण शहराच्या अदयापही समोर आले नाही. त्या प्रकारेच पानसरे यांना देखील भाजप कोणते पद देणार आहे हे भाजपाकडुन स्पष्ट सांगण्यात येत नाही.

सत्ता घालवण्यासाठी मेहनत
पानसरे यांनी महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता घालवण्यासाठी अतोनात कष्ट घेतले. भाजपाची कोणतीही बैठक पानसरे यांच्या उपस्थिती शिवाय पुर्णच होत नव्हती. पानसरे यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी पानसरे यांच्या यांच्या बरोबरच भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळेच राष्ट्रवादीची वाताहत होऊन भाजपाची महापालिकेवर एकहाती सत्ता येण्यास पानसरे यांची देखील भुमिका महत्वाची होतीच. पण भाजपाला सत्तासुख मिळताच चिंचवड व भोसरी वाल्यांनी आपला हिस्सा घेतला. पण पानसरे यांचे काय? हा प्रश्नाचे उत्तर अजुनही अधांतरीच आहे.