पिंपरी चिंचवड : भाजपाचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा पूर्णत: खोटी आहे. ते कुठेही भाजपा सोडून जाणार नाहीत. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर अखेर पानसरेंचे पुनर्वसन करणार असल्याचा ‘शब्द’ दिला आहे. त्यामुळे पानसरे हे राष्ट्रवादीत जाणार असल्याचे वृत्त खोटे असल्याचे भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
हे देखील वाचा
पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीकडून सत्ता खेचून भाजपाला यश मिळवून देण्यात शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे यांच्यासह आझम पानसरे यांचाही महत्वाचा वाटा होता. तसेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आझम पानसरे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. भाजपात गेल्यापासून त्यांचे पुनर्वसन होणार अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र पानसरेंच्या पदरी काहीच न पडल्यामुळे त्यांच्या समर्थकांत प्रचंड नाराजी पसरली होती. दरम्यान पानसरे त्यांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका राष्ट्रवादीचे नेते अध्यक्ष शरद पवार यांना देण्यासाठी गेले होते. त्यावेळी पवारांनी त्यांच्या तब्येतीबद्दल विचारपूस केल्याने ते गहिवरले होते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पानसरे हे पुन्हा राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा सुरू होती. पानसरेंची जुनी क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने त्यात आणखीनच भर पडली आहे. त्याबाबतच लक्ष्मण जगताप यांना विचारले असता, त्यांनी या अफवा असल्याचे सांगितले. डिसेंबर अखेर आझम पानसरेंचे पुनर्वसन करण्यात येईल असा शब्द खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.