आझाद हिंद संघटनेच्या वतीने तिघांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

0

चाळीसगावचे चित्रकार, कवी दिनेश चव्हाण यांचा समावेश
चाळीसगाव – आझादहिंद संघटना बुलडाणा यांच्या तर्फे महाराष्ट्रातील संघर्षमय प्रवास करून आपल्या क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या विविध क्षेत्रातील पुरस्काराची नुकतीच घोषणा संघटनेचे संस्थापक ॲड. सतिशचंद्र रोठे यांनी केली. महाराष्ट्रातून १० मान्यवरांची या पुरस्कारासाठी निवड गोपनीय पद्धतीने संघटनेने केली. यात जळगाव जिल्ह्यातून तीन लोकांना निवडण्यात आले. हे पुरस्कार त्यांना 20 जानेवारी रोजी वाशीम येथे रंगीन काव्यधारा साहित्य कला मंचच्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात प्रदान करण्यात येणार आहे, पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, महावस्त्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम असे असणार आहे. या तिघा विविध क्षेत्रातील या तिघांची निवड केल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

संघर्षातून गेले पुढे
ग्रामीण भागातून संघर्षातून आपल्या कलेला पुढे नेणाऱ्या कलाक्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कारासाठी चाळीसगाव येथील चित्रकार व कवी दिनेश चव्हाण यांची कलारत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. तर दुसरा सन्मान स्वतःचे कुटुंब सांभाळून कठीण परिस्थीतीतही, कुणाचे मार्गदर्शन नसताना आपल्या अंतरलेखणीला बळ देऊन काव्य क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या पाचोरा येथील कवयित्री ललिता पाटील यांना काव्यलेखनासाठीचा काव्यरत्न पुरस्कार, तर, आपल्या अडाणी अशिक्षित कुटुंबातून आपल्या लेखणीच्या जोरावर, शब्दांच्या पावसात वेदनेने व वास्तव सामाजिक आशय मांडणाऱ्या नवकवी दिनेश राठोड यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले.